युवतीवर सामूहिक बलात्कार : प्रियकरासह तिघांना आजन्म कारावास

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जुलै 2019

  • विटा येथील एकोणीस वर्षीय युवतीवर सामूहिक बलात्कार करून खून केल्याप्रकरणी तिघांना आजन्म कारावास शिक्षा. 
  • पीडित युवतीच्या प्रियकरासह तिघांना शिक्षा
  • लक्‍या ऊर्फ लक्ष्मण संदीपान सरगर (वय २०), अनुज अर्जुन पवार (वय २१), दादासो भास्कर आठवले (वय ३०, तिघे रा. गार्डी, ता. खानापूर) अशी त्या तिघांची नावे. 

सांगली - विटा येथील एकोणीस वर्षीय युवतीवर सामूहिक बलात्कार करून खून केल्याप्रकरणी तिघांना आजन्म कारावास शिक्षा सुनावण्यात आली. पीडित युवतीच्या प्रियकरासह तिघांना ही शिक्षा झाली. लक्‍या ऊर्फ लक्ष्मण संदीपान सरगर (वय २०), अनुज अर्जुन पवार (वय २१), दादासो भास्कर आठवले (वय ३०, तिघे रा. गार्डी, ता. खानापूर) अशी त्या तिघांची नावे आहेत. अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती उज्ज्वला नंदेश्‍वर यांनी ही शिक्षा सुनावली. सरकारपक्षातर्फे उल्हास चिप्रे यांनी काम पाहिले. सन २०१२ मध्ये ही घटना घडली होती. 

खटल्याची पार्श्‍वभूमी अशी, की मृत युवती अनुमिती चव्हाण आणि लक्‍या सरगर हे दोघेही गार्डी येथील एका कोल्ड स्टोअरेजमध्ये कामास होते. त्यावेळी त्यांची एकमेकांशी ओळख झाली. या ओळखीतून प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्यासाठीच ती १२ ऑक्‍टोबर २०१२ मध्ये घरातून निघून गेली. त्यानंतर चारच दिवसांनी विटा-मायणी रस्त्यावरील पवई टेकाजवळील पडक्‍या विहिरीत तिचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह सापडला. या तरुणीचे दोन्ही हात ओढणीने बांधलेल्या संशयास्पद स्थितीतील मृतदेह सापडल्याने पोलिसांनी शंका व्यक्त केली. त्यानंतर येथील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी केली. त्यावेळी तिचा तीन दिवसांपूर्वीच मृत्यू झाला. सामूहिक बालात्कार करून तिचा खून केल्याचेही उत्तरीय तपासणी अहवालात पुढे आले. खुनाचा गुन्हा दाखल करून त्या अनुषंगाने तपास करण्यात आला. 

युवती ही लक्‍या सरगर याच्या प्रेमात असल्याचे तापासात पुढे आले. त्यावेळी पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. सखोल चौकशी केली असता लक्‍या व त्याचा तीन मित्रांनी मिळून युवतीवर सामूहिक बलात्कार करून खून केल्याची कबुली दिली. चौघेही पवई टेक येथे उभे असल्याचे साक्षीदार संदीप शिंदे यांनी पाहिले होते.

त्यावेळी लक्‍या सरगर, अनुज पवार, दादासो आठवले आणि सागर हत्तीकर असे चौघे असल्याचे त्यांनी पाहिले होते, अशी साक्ष न्यायालयासमोर दिली होती. तत्कालीन निरीक्षक रवींद्र साळुंखे यांनी भक्कम पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे २० साक्षीदार तपासण्यात आले. संदीप शिंदे, सुदाम चव्हाण, रणजित मोहिते, अनिल पाटील यांची साक्ष महत्त्वाची ठरली. त्यानुसार न्यायालयाने शिक्षा सुनावली. विटा पोलिस ठाण्याचे हवालदार उत्तम ओंबासे, पोलिस नाईक सूर्यवंशी, श्री. मदने, वंदना मिसाळ, रमा डांगे यांनी सहकार्य केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rape case incidence in VIta three gets imprisonment