भाऊ आणि पित्यावर बलात्काराचा गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

भाऊ आणि वडील या पवित्र नात्यांना काळिमा फासणाऱ्या दोन घटना तालुक्‍यात घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यातील एका घटनेत तरुणाने अल्पवयीन असलेल्या सख्ख्या चुलतबहिणीवर बलात्कार केला, तर दुसऱ्या घटनेत एका नराधमाने पोटच्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे

पारनेर (नगर) : भाऊ आणि वडील या पवित्र नात्यांना काळिमा फासणाऱ्या दोन घटना तालुक्‍यात घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यातील एका घटनेत तरुणाने अल्पवयीन असलेल्या सख्ख्या चुलतबहिणीवर बलात्कार केला, तर दुसऱ्या घटनेत एका नराधमाने पोटच्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दोन्ही मुलींनी याबाबत अनुक्रमे पारनेर व सुपे पोलिस ठाण्यांमध्ये फिर्यादी दाखल केल्या असून, दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. नगर येथील विशेष न्यायालयाने आज दोन्ही आरोपींना शनिवारपर्यंत (ता. 16) पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. 

तरुणाचा चुलतबहिणीवर बलात्कार 

भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना तालुक्‍यातील वडगाव दर्या येथे रविवारी (ता. 10) दुपारी घडली. त्यात तरुणाने घरात एकट्या असलेल्या आपल्या अल्पवयीन चुलतबहिणीवर बलात्कार केल्याची फिर्याद पीडित मुलीनेच पारनेर पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून संबंधित तरुणाविरुद्ध बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

फिर्यादीनुसार पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः

पीडित अल्पवयीन मुलीचे कुटुंबीय रविवारी लग्नासाठी बाहेरगावी गेले होते. यामुळे मुलगी दुपारी घरात एकटीच टीव्ही पाहत होती. दुपारी एकच्या सुमारास तिचा चुलतभाऊ घरी आला आणि त्याने प्यायला पाणी मागितले. मुलगी पाणी आणण्यासाठी स्वयंपाकघरात गेली असता, त्याने दरवाजा आतून बंद केला आणि मुलीवर बलात्कार केला. याबाबत वडिलांना सांगितले तर ते मारतील, या भीतीने मुलीने रविवारी घटना सांगितली नाही. मात्र काल (सोमवारी) सकाळी वडील बाहेर गेले, तेव्हा मुलीने आईला या घटनेची माहिती दिली. नंतर आईने मुलीच्या वडिलांना हकिगत सांगितली. त्यामुळे पीडित मुलीसह आई-वडिलांनी काल पारनेर पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद दाखल केली. 

राजकीय दबावाचा प्रयत्न; आरोपी ताब्यात 

या गुन्ह्यातील आरोपी एका नेत्याच्या नावाने चालविण्यात येत असलेल्या प्रतिष्ठानाच्या, वडगाव दर्या येथील शाखेचा अध्यक्ष असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, हे प्रकरण गावातच मिटविण्यासाठी अनेकांनी काल दिवसभर मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी राजकीय दबाव टाकण्याचाही प्रयत्न झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, मुलगी आणि तिचे कुटुंबीय फिर्याद देण्याच्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे काल (सोमवारी) रात्री उशिरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि आरोपीला रात्रीच ताब्यात घेऊन अटक केली. 

पित्याचा मुलीवर बलात्कार; आरोपीस अटक 

सुपे (ता. पारनेर) परिसरातील एका नराधमाने स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर दोनदा बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलीने नगर येथील "चाइल्डलाइन'च्या मदतीने दिलेल्या फिर्यादीवरून सुपे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. 
 

याबाबत माहिती अशी ः सुपे परिसरातील एका नराधमाने शनिवारी (ता. नऊ) रात्री स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर (वय 15) बलात्कार केला. यापूर्वीही 28 सप्टेंबर रोजी त्याने याच मुलीवर बलात्कार केला होता. त्यामुळे पीडित मुलीने आईसह थेट नगर येथे येऊन चाइल्डलाइन संस्थेच्या पूजा पोपळघट व प्रवीण कदम यांची भेट घेत माहिती दिली. या दोघांनी काल (सोमवारी) मुलीसह सुपे पोलिस ठाणे गाठले. रात्री उशिरा पीडित मुलीने वडिलांच्या विरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिच्या वडिलांना तत्काळ अटक केली. 
सप्टेंबरमध्ये पहिल्यांदा असा प्रकार घडला, त्याच वेळी गुन्हा दाखल होणे अपेक्षित होते. मात्र, अनेक प्रतिष्ठितांनी त्यात हस्तक्षेप करून फिर्याद देण्यात अडथळा आणल्याचे समजते. 

अन्य दोन मुलींवरही बलात्कार 

"चाइल्डलाइन'च्या पूजा पोपळघट यांनी सांगितले, की पीडित मुलीचे कुटुंब गुजरातमधून उदरनिर्वाहासाठी नगर येथे आले होते. नंतर ते सुपे परिसरात आले. आरोपी मानसिकदृष्ट्या विकृत असून, त्याला चार मुली आणि चार मुलगे आहेत. त्यातील विवाहित असलेले दोन मुलगे सुपे येथेच राहतात. मोठी मुलगी विवाहित असून, ती मुंबईत राहते. दुसरी मुलगीही वडिलांकडून झालेल्या अत्याचाराला बळी पडली होती. गरोदर राहिल्याचे समजल्याने ती पळून गेली. तिसऱ्या मुलीवरही आरोपीने वारंवार अत्याचार केल्याने तिने आत्महत्या केल्याचे समजते. आता चौथ्या मुलीवरही आरोपीने अत्याचार सुरू केले होते. 

मुलगी सुप्याहून नगरला चालत आली 

पूजा पोपळघट म्हणाल्या, ""पीडित मुलीवर शनिवारी वडिलांनी बलात्कार केला, त्या वेळी मुलीची आई पतीला प्रतिकार करण्यासाठी पुढे गेली. त्या वेळी आरोपीने तिच्यावर चाकूने वार केले. आता डोक्‍यावरून पाणी जात असल्याचे लक्षात आल्याने पीडित मुलगी, तिच्या लहान भावाला घेऊन आई सुप्याहून सोमवारी पायी नगरला आले आणि "चाइल्डलाइन'मध्ये दाखल झाल्या. त्यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्यांना घेऊन सुपे पोलिस ठाण्यात गेलो.'' 

दोन गुन्हे दाखल करता येत नाहीत! 

पीडित मुलीने वडिलांविरुद्ध बलात्काराची फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्याच वेळी "आरोपीने मुलीच्या आईवर चाकूने वार केल्याची फिर्याद घ्यावी,' अशी मागणी "चाइल्डलाइन'तर्फे करण्यात आली. मात्र, सुपे पोलिसांनी तशी तक्रार घेण्यास नकार दिला. "एकाच वेळी दोन गुन्हे दाखल करता येत नाहीत,' असे अजब कारण पोलिसांनी सांगितले, असे पूजा पोपळघट म्हणाल्या. आता याबाबत आम्ही अण्णा हजारे प्रणीत भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाचे विश्‍वस्त ऍड. श्‍याम आसावा यांना माहिती दिली आहे. ते उद्या काही तरी करतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rape crime against brother and father