हुरडा पार्ट्या झाल्या दुर्मिळ..! 

हुरडा पार्ट्या झाल्या दुर्मिळ..! 

सोन्याळ (सांगली) - ज्वारीचे पीक बहारात आल्यानंतर पिकाशेजारी आगटी (शेकोटी) पेटवून बोचऱ्या थंडीत घेतलेला गरमागरम हुरड्याचा आस्वाद  काही औरच असतो. एके काळी जत तालुक्‍याच्या ग्रामीण भागात हमखास दिसणारे हे दृश्‍य काळाच्या ओघात दुर्मिळ झाले असले तरी अजूनही काही ठिकाणी मित्र व नातेवाईकांना बोलावून जिव्हाळ्याच्या हुरडा पार्ट्या होताना दिसत आहेत. मात्र ही प्रथा आणि संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. पूर्वी नवीन वर्षाच्या स्वागताला अशा हुरडा पार्ट्यांचा निमित्ताने आपल्या पाहुण्या रावळे आणि मित्र मंडळी यांना घरी बोलावून त्यांचा पाहुणचार करण्याची परंपरा शेतकरी वर्गात होती. पण शहरी लोकांसाठी अशा हुरडा पार्ट्या म्हणजे खास आकर्षण असते.

जत तालुक्‍यात ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतली जाते.  मात्र अलीकडच्या काळात सतत उद्‌भवणाऱ्या दुष्काळी परिस्थितीमुळे आणि डाळिंब द्राक्षे, पपई यासारख्या नगदी पिकांकडे शेतकऱ्यांचा वाढलेला कल यामुळे दिवसेंदिवस ज्वारीचे उत्पादन घटत  चालले आहे. पण यावर्षी तालुक्‍याच्या अनेक भागात पेरणी योग्य आणि पेरणी नंतर पाऊसच झाला नाही. त्यामुळेही ज्वारीच्या पेरणीवर परिणाम झाला आहे. काही प्रमाणात घेतलेले बागायती ज्वारीचे पीक मात्र सध्या हुरड्यात आलेले आहे. अशा ठिकाणी हुरडा पार्ट्या रंगू लागल्या आहेत. आगटीमध्ये भाजलेला गरमागरम हुरडा आणि सोबतीला गूळ व लसणाची चटणी यामुळे खवय्ये तृप्त होताना दिसत आहेत.

ग्रामीण संस्कृती जोपासा

अलीकडच्या काळात हुरडा पार्ट्या तर दुर्मिळ झाल्या आहेतच, पण संक्रांतीच्या वाणसाठी लागणारी ज्वारीची कणसे पण वेळ प्रसंगी भेटत नाहीत. हुरडा पार्टीच्या निमित्ताने एकत्र जमुन गरमागरम हुरड्याचा आस्वाद घेत गप्पाच्या छान मैफिली पूर्वी रंगायच्या. अलीकडे असे प्रसंग दुर्मिळ झाले आहेत. आपली ग्रामीण संस्कृती जोपासन्याच्या दृष्टीने हुरडा पार्ट्यासाठी खास प्रयत्न झाले पाहिजेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com