कुकाण्यात पुन्हा भूमिहीन झालेल्या शेतकर्‍यांचा रस्ता रोको

सुनील गर्जे
गुरुवार, 12 जुलै 2018

नेवासे-शेवगाव रस्त्यावर वनजमिन शेतकर्‍यांच्यावतीने रस्तारोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान राज्यातील 26 जिल्ह्यातील वनजमिनीचा प्रश्न असलेल्या या आंदोलनाची ठिणगी यानिमित्त नेवासे तालुक्यातून पडली आहे.

नेवासे : गेल्या 1959 पासून वनजमिनीवर असलेला आमचा हक्क कायम ठेवा, वनजमिनी पुन्हा शासनजमा न करता त्या नवीन सगणीकृत सातबार्‍यावर नावे लावून पुन्हा कसणार्‍या कष्टकरी शेतकर्‍यांच्याच नावावर करा या मागणीसाठी गुरुवार (ता. 12) रोजी कुकाणे (ता. नेवासे) येथे नेवासे-शेवगाव रस्त्यावर वनजमिन शेतकर्‍यांच्यावतीने रस्तारोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान राज्यातील 26 जिल्ह्यातील वनजमिनीचा प्रश्न असलेल्या या आंदोलनाची ठिणगी यानिमित्त नेवासे तालुक्यातून पडली आहे.
 
या रस्तारोको आंदोलनाचे नेतृत्व ज्येष्ठ कामगार नेते बाबा आरगडे, अरुण मिसाळ, प्राचार्ये स्वरूपचंद गायकवाड, प्रा. भाऊसाहेब सावंत, रमेश हिवाळे यांनी केले. याबाबत माहिती अशी, कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या सत्याग्रहानंतर 1959 मध्ये देशभरातील भूमिहिन कष्टकऱ्यांना वाटप करण्यात आलेल्या वनजमीनी शासनाच्या केंद्र व राज्य पातळीवरील वन व महसूल विभागांतील विसंवादामुळे तब्बल पन्नास वर्षांनंतर परत शासनजमा करण्यात आल्याने या लोकांच्या उपजिवीकेचा प्रश्न निर्माण झाल्याने नावावर असलेल्या वनजमींनी 1959 मध्ये देशभरातील भूमिहिन कष्टकऱ्यांना वाटप करण्यात आलेल्या वनजमीनी पुन्हा शासनजमा करण्यात येत आहे. त्या जमिनी पुन्हा शासनजमा न करता पुन्हा त्याच शेतकर्‍यांच्या नावावर करा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी बाबा आरगडे, प्रभाकर खंडागळे, प्राचार्य स्वरूपचंद गायकवाड, प्रा. भाऊसाहेब सावंत, बाळासाहेब उंडे यांची भाषणे झाली. नायब तहसीलदार नारायण कोरडे व पोलिस उपनिरीक्षक प्रमोद भिंगारे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी शिवाजी थोरात, प्रल्हाद कांबळे, नाथा गुंजाळ, रवी कांबळे, विश्वास हिवाळे, दिलीप कांबळे, कैलास गायकवाड, सुनील गायकवाड, प्रेमचंद हिवाळे, सुनील गायकवाड कुबेर उगले यांच्यासह चिलेखनवाडी, देडगाव, माका व पाचुंदे येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

'सकाळ'मुळेच प्रश्न ऐरणीवर : प्रा. भाऊसाहेब सावंत -
आंदोलन प्रसंगी बोलतांना प्रा. भाऊसाहेब सावंत यांनी 31 जानेवारी 2018 रोजी 'सकाळ'ने 'पन्नास वर्षांनंतर पुन्हा भूमिहिन बनलेल्या कष्टकरी आंदोलनाचा वणवा पेटणार' या प्रसिद्ध झालेल्या बातमी मुळेच हा प्रश्न ऐरणीवर आला असून कष्टकरी शेतकर्‍यांना आपल्या वनजमिनी पुन्हा शासनजमा होत असल्याचे समजल्याने शेतकरी आंदोलनासाठी एकत्र आले.

अमरावती येथे 14 ऑगस्ट'ला बैठक -
वनजमिनीचा हा प्रश राज्यातील 26 जिल्ह्यातील शेतकर्‍यांना भेडसावत असून याबाबत राज्यस्तरावर आंदोलन करण्याच्या नियोजनासाठी येत्या 14 ऑगस्ट रोजी 26 जिल्ह्यातील प्रतिनिधींची बैठक होणार असून त्यात आंदोलनाची रूपरेषा ठरणार असल्याचे या आंदोलनाचे नेते बाबा आरगडे व अरुण मिसाळ यांनी सांगितले. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Rasta roka agitation of landless farmers at Kukana nagar