पांगरीत रस्त्यासाठी रास्ता रोको आंदोलन 

pangari
pangari

पांगरी - बार्शी-पांगरी-उस्मानाबाद हद्दीपर्यतचा राज्यमार्गावर डांबरीकरण करण्यात यावे या मागणी करिता पांगरी पंचक्रोशीतील जनतेने तब्बल अडीच तास रास्ता रोको आंदोलन केले. या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामास बुधवार (ता.१३) पर्यंत सुरूवात करणार असल्याची ग्वाही सहाय्यक अभियंता सुनिता पाटील व ठेकेदारचे प्रतिनिधी प्रदीप सातपुते यांनी दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन संपविण्यात आले.

बार्शी-लातूर रस्त्यावर पांगरी बसस्थानकासमोर सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास रास्ता रोको आंदोलनास सुरूवात करण्यात आली. तब्बल अडीच तास पुणे -लातूर रस्ता अडवून धरल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रस्त्यासाठीच आंदोलन असल्याने वाहन चालक रोजच्या त्रासदायक प्रवासामुळे ते ही उतरून यात सामील झाले होते. यावेळी बारावी, दहावीच्या परिक्षेस जाणारी विद्यार्थ्यांची वाहने, रूग्णवाहिकेस आंदोलकांनी रस्ता मोकळा करून दिला. आंदोलन स्थळी सहाय्यक अभियंता उशीरा दखल झाल्याने आंदोलकाच्या रोषास सामोरे जावे लागले.

यावेळी डॉ.अरूण नारकर, तात्या बोधे, प्रा.विशाल गरड, सतीश जाधव, शामराव शिकेतोड, विलास गोडसे, गणेश गोडसे, डॉ.अरिफ शेख, बापू नारकर, बाबा ढवळे, रवि माळी, नवनाथ जगताप आदींनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभार व ठेकेदाराची मनमानी यावर सडकून विचार व्यक्त केले. 

बार्शी-पांगरी-उस्मानाबाद हद्दीपर्यतचा जवळपास तीस कि.मी. अंतरातील अतिशय खराब झालेल्या ठिकाणी दोन तीन महिन्यापुर्वी खडीकरण करण्यात आले. हे काम अनेक ठिकाणी उचकटले असून रस्त्यावर खडीकरणाने निर्माण केलेल्या उंचवट्यामुळे प्रवास जबर धक्का बसून दुखापतीच्या आजारास बळी पडले आहेत.

या त्रासास कंटाळून पांगरी पंचक्रोशीतील जनतेने ता.१४ फेब्रुवारी रोजी पहिल्याच रस्त्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे संबंधित अधिकारी यांना निवेदनाव्दारे कळविले होते. या निवेदनाची दखल घेत सहाय्यक अभियंता सह इतर कर्मचारी यांनी पांगरी येथे येऊन आंदोलकाची भेट घेत दिवस रस्त्याने काम चालू करण्यात देखील पत्र देऊन आंदोलन थांबविण्यात यशस्वी झाल्या होत्या. त्यानंतर वीस दिवसाचा कालवधी लोटला तर रस्त्याच्या कामास सुरूवात न झाल्याने पुन्हा आज (ता.६)आंदोलनाचा पवित्रा घेतला गेला. जोपर्यंत या रस्त्याच्या कामास सुरूवात होते नाही तोपर्यंत रास्ता रोको आंदोलन चालू ठेवण्याचा सर्वानुमते विचार झाला होता. मात्र उशीरा का होईना पण सहाय्यक अभियंता सुनिता पाटील यांनी आठ दिवसात रस्त्याच्या कामास सुरूवात करण्यात येईल अशी ग्वाही दिल्यानंतर आंदोलन थांबवून रस्ता मोकळा करण्यात आला.

एवढे करून रस्त्याचे काम आठ दिवासात चालू न झाल्यास आमरण उपोषण व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयास टाळे ठोकण्यात येतील असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला. 

आंदोलनात सुहास देशमुख, डॉ.अरूण नारकर, काशीनाथ माने, साहेबराव पवार, जयंत म्हसे, शहाजहान बागवान, भगवान खबाले, पप्पू देशमुख, मोहन घावटे, विजय गोडसे, विश्वास देशमुख, नाना गायकवाड, दिपक शेळके, शहाजी काळे, धनंजय तौर, सरपंच युन्नूसबागवान, उमेश गाढवे, विष्णू घोडके, कैमुद्दीन काझी, नाना देशमुख, फारूक शेख, विलास जाधव, राजेंद्र येडे, विलास लाडे, जैनुद्दीन शेख, महादेव पाटील, कांतीलाल गरड यांच्यासह मोठ्या संख्येने गामस्थ उपस्थित होते. यावेळी वेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पांगरी व बार्शी येथील पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com