वेळंबमधील बंदूक कारखान्यावर पोलिसांची कारवाई

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जानेवारी 2018

रत्नागिरी -  वेळंब-लोहारवाडी (ता. गुहागर) येथील बेकायदेशीर बंदूक कारखाना पोलिसांनी उद्‌ध्वस्त केला. यामध्ये १२ बोअर डबल बॅरल बंदुकीची नळी, वेगवेगळया आकाराचे बंदुकीचे लाकडी बट, बंदुकीचे चेंबर, लोखंडी नळया, वेगवेगळे पार्ट, असे एकूण ३२ हजारांचे साहित्य जप्त केले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी एका संशयितास अटक केली. 

रत्नागिरी -  वेळंब-लोहारवाडी (ता. गुहागर) येथील बेकायदेशीर बंदूक कारखाना पोलिसांनी उद्‌ध्वस्त केला. यामध्ये १२ बोअर डबल बॅरल बंदुकीची नळी, वेगवेगळया आकाराचे बंदुकीचे लाकडी बट, बंदुकीचे चेंबर, लोखंडी नळया, वेगवेगळे पार्ट, असे एकूण ३२ हजारांचे साहित्य जप्त केले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी एका संशयितास अटक केली. 

रमेश शंकर काताळकर (वय ४९, रा. लोहारवाडी-गुहागर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. काताळकर बेकायदा बंदूक व हत्यारे दुरुस्तीचा कारखाना चालवत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. पोलिस अधीक्षक प्रणय अशोक, अपर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक शिरीष सासने, पोलिस उपनिरीक्षक रविराज फडणीस, सहायक पोलिस उपनिरीक्षक सुभाष माने, पोलिस हवालदार दिनेश आखडे, पोलिस नाईक उदय वाजे, चालक दत्ता कांबळे यांचे पथक काल गुहागरला रवाना झाले. 

पथकाने गुहागर तालुक्‍यातील वेळंब गावातील लोहारवाडी येथील रमेश काताळकर याच्या घरावर छापा टाकला. घराला लागून असलेल्या अंगणात लोहारकाम शाळेमध्ये एक व्यक्ती बंदुकीचे नवीन नळी वेल्डिंग करीत असताना मिळून आला. त्यावेळी त्याच्याकडे बंदूक वापरण्याचे अगर दुरुस्त करण्याचा परवाना नसल्याचे दिसून आले. यावरून त्याचे सुतार शाळा/कारखान्याची झडती घेण्यात आली. त्या ठिकाणी एक १२ बोअर डबल बॅरल बंदुकीची नवीन तयार केलेली नळी, वेगवेगळया आकाराचे बंदुकीचे लाकडी बट, बंदुकीचे चेंबर, लोखंडी नळया, बंदुकीचे लाकडी झाड तयार करण्याची लाकडे, बंदुकीचे वेगवेगळे पार्ट तयार करण्यासाठी तयार केलेले कागदी पुढ्यांचे छाप इत्यादी बंदूक तयार करण्यासाठी तसेच बंदूक दुरुस्तीचे साहित्य मिळाले. ३२ हजार किमतीचे हे साहित्य आहे. या प्रकरणी संशयित रमेश काताळकर याच्याविरुद्ध गुहागर पोलिस ठाण्यात हत्यार अधिनियमान्वये गुन्हा दाखल करून अटक केल्याचे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

बेकायदेशीरपणे पुन्हा कारखाना
पोलिसांनी याच कारख्यान्यावर २००८ मध्ये छापा टाकून कारवाई केली होती. स्थानिक गुन्हे शाखेने काल पुन्हा छापा टाकून बेकायदेशीर बंदूक कारखाना उद्‌ध्वस्त केला. यावरून कारवाईनंतर पुन्हा याच ठिकाणी हा बेकायदेशीर कारखाना उभारण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: Ratnagiri News Police action on the gun factory