लाचखोर डेप्युटी चिटणीस प्रदीप कदमला अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर - नेमबाज खेळाडूला मंजूर झालेला शस्त्र परवाना देण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना डेप्युटी चिटणीस प्रदीप शिवाजीराव कदम (वय ४२, रा. ए वॉर्ड, कोंडेकर गल्ली, शिवाजी पेठ, कोल्हापूर) याला रंगेहाथ पकडले.

कोल्हापूर - नेमबाज खेळाडूला मंजूर झालेला शस्त्र परवाना देण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना डेप्युटी चिटणीस प्रदीप शिवाजीराव कदम (वय ४२, रा. ए वॉर्ड, कोंडेकर गल्ली, शिवाजी पेठ, कोल्हापूर) याला रंगेहाथ पकडले.

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास छापा टाकून त्याला अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.

तक्रारदार समृद्ध दिलीप मोरे (रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर) यांनी राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत पाचवेळा भाग घेतला आहे. त्यांना ०.२२ व पिस्टल नेमबाज स्पर्धा या प्रकारांत बक्षिसे मिळाली आहेत. त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या हत्यारांचे परवाने नसल्यामुळे त्यांना स्पर्धेवेळी इतरांची हत्यारे घ्यावी लागतात. त्याचा परिणाम कामगिरीवर होत होता. शूटिंग स्पोर्टससाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या पाच प्रकारच्या हत्यारांचे परवाने मिळावेत यासाठी १५ डिसेंबर २०१७ ला जिल्हाधिकाऱ्यांकडे कागदपत्रांसह अर्ज सादर केला होता. अर्ज दिल्यानंतर तो अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयातील डेप्युटी चिटणीस प्रदीप कदम याच्याकडे गेला होता.

कदमने तक्रारदार यांचा अर्ज निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत प्रांताधिकारी, करवीर यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविला. त्यावर प्रांताधिकाऱ्यांनी योग्य शेरा देऊन १२ जानेवारी २०१८ला कदम याच्यासह तक्रारदार यांना जिल्हाधिकाऱ्यांकडे नेले. अपर जिल्हाधिकारी यांनी फाईल पाहून सही केली. कदम याने तक्रारदार यांच्या पाचपैकी फक्त रायफलचा परवाना दिला. कदम याने परवाना मिळवून दिल्याच्या बदल्यात वीस हजार रुपयांची मागणी केली. फेब्रुवारीच्या शेवटी येण्यास सांगितले. कदम याने मागितलेली लाच दिली नाही, तर इतर परवान्यांत तो खोडा घालेल अशी भीती तक्ररदारांना वाटली. त्यामुळे तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाकडे कदमच्या विरोधात तक्रार दिली. 

दरम्यान, आज सायंकाळी सहाच्या सुमारास कदमने पैसे घेऊन बोलावले होते. त्यामुळे दोन पंचांच्या साक्षीने आज सायंकाळी सहाच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. तेव्हा तो जिल्हाधिकारी कार्यालयातच वीस हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ सापडला.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक गिरीश गोडे, पोलिस हवालदार श्रीधर सावंत, मनोज खोत, पोलिस नाईक आबासो गुंडणके, संदीप पावलेकर, पोलिस कॉन्स्टेबल रूपेश माने, पोलिस नाईक विष्णू गुरव आदींनी ही कारवाई केली.

नेमबाजी स्पर्धा मार्चपासून
तक्रारदार असलेल्या नेमबाजाची स्पर्धा मार्चमध्ये सुरू होणार आहे. डिसेंबरपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे; तरीही कदमने परवान्याबाबत टोलवाटोलवी केली. कदम जिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यासन सात, गृह एक विभागात काम करीत असल्यामुळे त्याचा रुबाब वेगळा होता. खाबूगिरीची खुर्ची म्हणून या पदाकडे पाहिले जाते. त्यामुळे शक्‍यतो कोण तक्रार करीत नाही; मात्र मार्चपासून स्पर्धा असल्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली.

Web Title: Ratnagiri News Pradeep Kadam arrested