दाम्पत्याचा मृत्यू कळला तीन दिवसांनी ही शोकांतिका

मुझफ्फर खान
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

चिपळूण - चिपळुणातील परशुरामनगर येथे वृद्ध धामणस्कर दाम्पत्याने राहत्या घरी केलेली आत्महत्या चटका लावणारीच. परंतु, त्याहीपेक्षा त्यांच्या मृत्यूची घटना उघड होण्यास तीन दिवस लागले, ही शोकांतिका. पत्रक देण्यासाठी गेलेल्या तरुणामुळे ते लक्षात आले. नाहीतर अजून किती दिवस लागले असते. या शोकांतिकेला दोन करुणाजनक पदर आहेत.

चिपळूण - चिपळुणातील परशुरामनगर येथे वृद्ध धामणस्कर दाम्पत्याने राहत्या घरी केलेली आत्महत्या चटका लावणारीच. परंतु, त्याहीपेक्षा त्यांच्या मृत्यूची घटना उघड होण्यास तीन दिवस लागले, ही शोकांतिका. पत्रक देण्यासाठी गेलेल्या तरुणामुळे ते लक्षात आले. नाहीतर अजून किती दिवस लागले असते. या शोकांतिकेला दोन करुणाजनक पदर आहेत.

वृद्धापकाळी भेडसावणाऱ्या एकाकीपणाच्या समस्या आणि बदलत्या फ्लॅट वा बंगला संस्कृतीत शेजारच्याशीही संपर्क नसणे. मोठ्या शहरामधील आधुनिक संस्कृती चिपळुणातही दारी आली, ही भेडसावणारी शंका मनाला सुन्न करणारीच. 
शहरीकरण होत असताना कोकणातील अनेक गावांत फ्लॅट संस्कृती उभी राहिली. आता तर टोलेजंग इमारतीही. वेगवेगळे बंगले आणि रोजगाराच्या संधी येथे कमी असल्याने तरुण बाहेर. घरांमध्ये वृद्ध, त्यामुळे त्यांना खाऊन उठणारे एकाकीपण. या समस्या कोकणातही वाढू लागल्या आहेत. 

जयवंत दळवी यांच्या ‘संध्याछाया’ नाटकाची कथा आता कोकणासह शहरी भागातही दूरवरची नाही, असाच याचा अर्थ. छोट्या शहरांमध्येही शेजारी आहे, पण ‘शेजार’ नाही, अशी अवस्था झाली. तीन दिवस वृद्ध दाम्पत्य बंगल्याबाहेर दिसले नाही, हा आजूबाजूच्या वस्तीतील लोकांचा दोष निश्‍चितच नाही. परंतु ही जाणीवही होण्याएवढा वेळ आता उरला नाही, ही वस्तुस्थिती मात्र मन विषण्ण करणारी. सोशल मीडियामुळे एका आसनावर बसलेले दोघेही एकमेकापासून पार दूर असतात.

आता शेजार या संकल्पनेतही फारसा ओलावा राहिलेला नाही.
येथील नगरसेवक शशिकांत मोदी यांनी सांगितले की, परशुराम सदाशिव धामणस्कर (वय ६७) हे मन मिळावू स्वभावाचे होते. वीस वर्षांहून अधिक काळ त्यांनी परदेशात नोकरी केली. त्यांचा एक मुलगा विदेशात तर दुसरा चिपळूणला राहतो. ते शेजाऱ्यांशी संपर्क ठेवूनही होते. त्यांना वृत्तपत्र वाचनाची आवड होती. परशुरामनगरमधील काही समस्यांबाबत ते मला नेहमी सूचना करायचे. ते आणि त्यांची पत्नी प्रभावती (वय ६२) मधुमेह आणि इतर आजारांमुळे गेली काही महिने त्रस्त होते. आजारपणावर मात करण्यासाठी दोघे किमान एक तास चालायचे. वारंवार आजारपणाला कंटाळलोय, असे सांगायचे. मात्र त्यांनी उचललेले टोकाचे पाऊल आणि त्यानंतरची परिस्थिती मनाला वेदना देणारी आहे.

ग्रामीण भागात कोणाचे निधन झाले तर सुटी घेऊन लोक अंत्ययात्रेला जातात. फ्लॅट संस्कृतीत मात्र अनेक वेळा लोक यापासून दूर राहताना दिसतात. शेजारी निधन झालं तर घरातून लवकर बाहेर पडून कामावर गेलं पाहिजे, नाहीतर अडकून पडायला होईल, अशी विचारसरणी बळावते आहे. त्याही पलीकडे फ्लॅट संस्कृतीतील निधनांच्या घटना आता सोसायटीच्या नोटीस बोर्डावर समजू लागल्या, हे अत्यंत दुर्दैवी आहे. 
- संजय धामणस्कर,
चिपळूण 

येथे एखादा माणूस आजारी पडला तर शेजारी नागरिकांकडून चौकशी केली जाते. कोणी बिस्किटे आणतो, तर कोणी नारळ पाणी आणतो. फ्लॅट संस्कृतीमुळे माणूस गेला तरी समजत नाही. आपण बरे आणि आपले घर बरे ही भावना आता वाढीस लागते आहे.
- गणेश धुरी,
खेर्डी

 

Web Title: Ratnagiri News senior citizen suicide incidence