Teacher's Day 2019 : शिक्षकांनी केला शाळेचा अन्‌ गावाचा कायापालट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

शाळेत घडलेले अधिकारी 
सुशांत शिंदे उपजिल्हाधिकारी, तानाजी बरडे पोलिस अधीक्षक कमिशनर, महेश शिर्के-पाटील एपीआय, अंकेत भुजबळ ॲग्रीकल्चर ऑफिसर, चंद्रकांत रासकर गुन्हे अन्वेषण शाखाधिकारी, याशिवाय ४५ प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिक्षक.

शिक्षकदिन 2019 : पोथरे - देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे, असे विंदा करंदीकरांनी म्हटलं आहे. याची प्रचिती रावगाव ग्रामस्थांना आलेली आहे. ज्या शाळेत शिकलो त्याच शाळेच्या प्रगतीसाठी व गावाच्या विकासासाठी शिक्षकांचे योगदान हे मोलाचे असते. बंद पडण्याच्या मार्गावर आलेली प्राथमिक शाळा त्यांनी दिलेल्या योगदानातून पुन्हा तालुक्‍यात गुणवत्ता यादीमध्ये आली. एवढेच नाही तर या शाळेचे विद्यार्थी उपजिल्हाधिकारी पदापर्यंत जाऊन पोचले आहेत. शिक्षकाने ठरवलं तर शाळेचा व गावाचा कायापालट नक्कीच होतो, हे येथील शिक्षकांनी दाखवून दिलं आहे. 

रावगाव (ता. करमाळा) येथील प्राथमिक शाळेची इमारत ही १९६२ मध्ये उभा राहिली. येथे सातवीपर्यंत शाळा आहे. पुढे गावात माध्यमिक शाळा सुरू झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांचा कल माध्यमिककडे वळला व प्राथमिक शाळेला उतरती कळा लागली. योगायोगाने याच शाळेत शिकलेले अनिल काळुंखे, माधव फुंदे, अशोक बरडे, दादा बुधवंत, संतोष फुंदे, मारुती जाधव हे विद्यार्थी शिक्षक झाले व याच शाळेत शिक्षक म्हणून आले. शाळेची दयनीय अवस्था पाहून त्यांनी शाळेचे रूप बदलवण्याचे ठरवले. त्यांनी शाळेची गटार स्वत: स्वच्छ करण्यापासून सुरवात केली. त्यानंतर स्वच्छतागृह, वर्गखोल्या दुरुस्ती, रंगरंगोटी, प्रशस्त क्रीडांगण, परसबाग आदी सुविधा निर्माण केल्या. यासाठी स्वतः प्रत्येक शिक्षकांनी ११ हजार रुपये जमा केले व गावकऱ्यांच्या मदतीने तीन लाख ५० हजार रुपये लोकसहभाग जमला. हा निधी शाळेसाठी खर्च केला. गुणवत्तावाढीसाठी सकाळी एक तास व सायंकाळी सहा ते १० या वेळेत जादा तास घेऊन शाळा तालुक्‍यामध्ये गुणवत्ता यादीत आणली.

आजही हे शिक्षक गावाकडे आल्यानंतर शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना ज्ञानदान करतात तर काही शिक्षक सुटीच्या वेळेस आल्यानंतर जादा तास घेतात. यातून १८ विद्यार्थी नवोदय स्कॉलरशीप गुणवत्ता यादीमध्ये निवडले असून अनेक विद्यार्थी उच्च पदापर्यंत गेले आहेत. शिक्षकांनी ठरवलं तर शाळेचा व गावाचा कायापालट होऊ शकतो, हे येथील शिक्षकांनी दाखवून दिलं आहे.

ज्या शाळेत घडलो त्याच शाळेत ज्ञानदानासारखे पवित्र कार्य करण्याची संधी मिळाली. ही शाळा मला ज्ञानदानासाठी सतत प्रेरणा देते.
- अनिल काळुंखे, प्राथमिक शिक्षक, रावगाव 

ज्ञानरचनावादी दृष्टिकोन अंगीकारून ज्ञानदान केले तर विद्यार्थी नक्की घडतात. यातूनच या शाळेत अनेक अधिकारी, कर्मचारी घडले आहेत.
- माधव फुंदे, प्राथमिक शिक्षक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ravgav School and Village Development by Teacher