रविकांत तुपकर म्हणाले, शेतकरी संघटनेने केलाय 'हा' निर्धार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

महापुरामुळे जसे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी नागरिकांचे नुकसान झाले तसेच नुकसान ऑक्टोबरमध्ये नांदेड भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे झाले आहे. कापूस, सोयाबीन सारख्या हातच्या पिकांचे अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. म्हणून हक्काचे दाम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी संघर्षाला तयार राहावे. 

हुपरी ( कोल्हापूर ) - लोकांनी राजकारणाचा ट्रेंडच बदलून टाकला आहे. एका लुगड्याने बाई म्हातारी होत नाही. म्हणून एका पराभवाने खचून जाणार नाही. घरावर तुळशीपत्र ठेवून पुढच्या पाच वर्षांत शेतकरी संघटनेचे एकाचे पन्नास आमदार करण्याचा निर्धार केला आहे. उद्याच्या ऊस परिषदेच्या माध्यमातून साखर कारखानदाराकडून शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे पदरात पाडून घेतल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यानी येथे दिला.

स्वाभिमानी शेतकरी संघटना हातकणंगले तालुका व हुपरी शहर शाखेतर्फे येथे आज आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोपळे होते. 

हेही वाचा - निसर्गाने हिरावल्याने तरूणांसमोर उरला हा पर्याय 

कोल्हापूर, नांदेड येथे पिकांचे नुकसान

प्रकाश पोपळे म्हणाले, महापुरामुळे जसे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी नागरिकांचे नुकसान झाले तसेच नुकसान ऑक्टोबरमध्ये नांदेड भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे झाले आहे. कापूस, सोयाबीन सारख्या हातच्या पिकांचे अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. म्हणून हक्काचे दाम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी संघर्षाला तयार राहावे. 

हेही वाचा - क्यार वादळातील नुकसानग्रस्तांना तुटपुंजी भरपाई

उसासाठी दुहेरी संघर्ष

वैभव कांबळे म्हणाले, यंदा आपणाला उसासाठी दुहेरी संघर्ष करायला लागणार आहे. उसाच्या दराचा संघर्ष हा नेहमीचाच आहे, पण त्या शिवाय पुरामुळे बाधित झालेला ऊस कसा आधी गेला पाहिजे यासाठी कारखान्यांबरोबर संघर्ष करावा लागणार आहे. राणोजी ठोंबरे, एम. आर. पाटील (रांगोळी) आदींची भाषणे झाली. मेळाव्यास नांदेडचे जिल्हाध्यक्ष किसनराव कदम, हणमंत राजेगोरे, हिंगोली जिल्हा अध्यक्ष रावसाहेब अडकिणे, अप्पासाहेब एडके, माजी सरपंच अप्पासाहेब देसाई, मानसिंगराव देसाई, बाबासाहेब गायकवाड, सुरेश पाटील, रामगोंडा पाटील, सुभाष अक्कोळे, डाॅ.विनोद चौगुले, किरण पोतदार, प्रकाश मोरबाळे, रघुनाथ पाटील (रेंदाळ), बाळासाहेब मोरबाळे आदी उपस्थित होते. शहराध्यक्ष अशोक बल्लोळे यांनी स्वागत केले. तालुका अध्यक्ष राजाराम देसाई यांनी प्रास्ताविक केले. आभार प्रदर्शन व सुत्रसंचालन नानासाहेब भोसले यांनी केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ravikant Tupkar Comment On Farmers Organisation Decision