रावसाहेब चव्हाण, महानंदा सूर्यवंशी यांची चौकशी

युवराज पाटील
बुधवार, 4 जुलै 2018

कोल्हापूर - महापालिकेचे सहायक अभियंता रावसाहेब चव्हाण, तसेच कनिष्ठ अभियंता महानंदा सूर्यवंशी यांच्या विभागीय चौकशीचे आदेश आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले आहेत. त्यांच्यासह सर्व्हेअर अर्जुन कावळे यांच्याही चौकशीचे आदेश झाले आहेत. चव्हाण यांची नुकतीच राजारामपुरी विभागीय कार्यालयाकडे, तर सूर्यवंशी यांची प्रोजेक्‍टकडे बदली झाली आहे.

कोल्हापूर - महापालिकेचे सहायक अभियंता रावसाहेब चव्हाण, तसेच कनिष्ठ अभियंता महानंदा सूर्यवंशी यांच्या विभागीय चौकशीचे आदेश आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले आहेत. त्यांच्यासह सर्व्हेअर अर्जुन कावळे यांच्याही चौकशीचे आदेश झाले आहेत. चव्हाण यांची नुकतीच राजारामपुरी विभागीय कार्यालयाकडे, तर सूर्यवंशी यांची प्रोजेक्‍टकडे बदली झाली आहे.

कामातील निष्काळजीपणा, दप्तरदिरंगाई यामुळे आयुक्तांनी वर्षभरात कारवाईचा बडगा उगारला आहे. पगारवाढ रोखली गेली आहे. आजच्या घडीला ४५ ते ४७ कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी सुरू आहे. चार-पाच वर्षांपासून सातत्याने गैरहजर राहिलेल्या सात कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले गेले आहे. प्रशासकीय दिरंगाई प्रकरणी आयुक्तांनी कठोर पावले उचलली असताना रावसाहेब चव्हाण व महानंदा सूर्यवंशी यांना चौकशीला सामोरे जावे लागत आहे. चव्हाण हे नगररचना विभागात कार्यरत होते. कसबा बावडा येथील रस्ता हस्तांतर प्रश्‍नी त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला. याच कामी सर्व्हेअर कावळे यांची चौकशी होणार आहे. चव्हाण यांच्याबाबत रस्ते हस्तांतरणासह वर्कशॉपमधील त्यांच्या कामाची पद्धत, अन्य मुद्यांबाबत चौकशी होत आहे. त्यांची नुकतीच विभागीय कार्यालय क्रमांक तीनकडे बदली झाली आहे.

महानंदा सूर्यवंशी या विभागीय कार्यालय क्रमांक तीनकडे कार्यरत होत्या. त्यांच्या कार्यपद्धतीबाबत तक्रारी होत्या. उपशहर अभियंत्यांनी चौकशीची शिफारस केली. आयुक्तांकडून त्यासंबंधीची फाईल मंजूर होऊन पुढील कार्यवाहीसाठी आस्थापना विभागाकडे आली आहे.

‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ असे उपरोधिकपणे बोलले जाते. महापालिकेतील फायलींचा निपटारा, बांधकाम परवानगीसाठी मारायला लागणाऱ्या फेऱ्या चर्चेचा विषय ठरतात. तत्कालीन आयुक्त पी. शिवशंकर यांनी शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. विद्यमान आयुक्त डॉ. चौधरी यांनी याकामी कडक धोरण अवलंबिले. दप्तरदिरंगाईसंबंधी त्यांनी बड्या अधिकाऱ्यांची पगारवाढ रोखली. प्रशासकीय कामाला शिस्त लागावी, यासाठी पावले उचलली गेली. दोन महिन्यांत सातत्याने गैरहजर कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी झाली. त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई झाली. कर्मचारी वर्ग एकचा असो अथवा चारमधील दोषी आढळल्यास आयुक्तांनी कारवाईची भूमिका घेतली आहे.

रावसाहेब चव्हाण, सर्व्हेअर कावळे यांची आयुक्तांच्या आदेशानुसार विभागीय चौकशी होत आहे. महानंदा सूर्यवंशी यांच्यासंबंधीची फाईलही आयुक्तांकडून मंजूर होऊन आली. विविध विभागांतील ४५ ते ४७ कर्मचाऱ्यांची वेगवेगळ्या कारणांनी खातेनिहाय चौकशी सुरू आहे. सातत्याने गैरहजर राहणाऱ्या सात कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई झाली.
- सुधाकर चेल्लावार, कामगार अधिकारी

Web Title: ravsaheb chavan mahananda suryaavanshi inquiry crime