नारायण मूर्ती, अनु आगा यांना  "रयत'चे पुरस्कार जाहीर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

सातारा येथे रयत शिक्षण संस्थेचा शंभरावा वर्धापन दिन शुक्रवारी (ता. 4) साजरा होणार आहे. त्यावेळी या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.

सातारा : रयत शिक्षण संस्थेच्या वतीने दिला जाणारा "पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार' इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांना तर "रयत माउली सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार' थरमॅक्‍स कंपनीच्या माजी अध्यक्षा अनु आगा यांना जाहीर झाला आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि अडीच लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 

हा पुरस्कार माजी केंद्रीय कृषिमंत्री व रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (ता. 4) सकाळी साडेनऊ वाजता कर्मवीर समाधी परिसरात होणाऱ्या कार्यक्रमात प्रदान केला जाणार आहे, अशी माहिती संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कराळे यांनी दिली. 

सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक अशा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून राष्ट्रीय विकासात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींना संस्थेच्या वतीने दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. 

रयत शिक्षण संस्थेचा शंभरावा वर्धापन दिन शुक्रवारी (ता. 4) साजरा होणार आहे. त्यावेळी या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. या कार्यक्रमास संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील, संस्थेच्या मॅनेजिंग कौंन्सिलचे सदस्य ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष ऍड. भगीरथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सचिव प्राचार्य डॉ. कराळे यांनी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rayat awards decleared to Narayan Murti and Anu Aga