‘रयत’ उभारणार चार आंतरराष्ट्रीय शाळा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मे 2019

आंतरराष्ट्रीय शाळांत...

  • प्रशिक्षित शिक्षक (आंतराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्यासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षकांना खास प्रशिक्षण)
  • सर्व शाळांना सुसज्ज इमारत
  • स्वच्छ परिसर व मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे
  • संगणक कक्ष आणि इंटरनेट सुविधा
  • शैक्षणिक तंत्रज्ञान वापराच्या सुविधा
  • विद्यार्थ्यांची वाहतूक व्यवस्था

सातारा - आपल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता जागतिक पातळीची असावी, ते आंतरराष्ट्रीय जाणिवेचे तयार व्हावेत, यासाठी रयत शिक्षण संस्था साताऱ्यात तीन आणि पुण्यात एक अशा चार आंतरराष्ट्रीय शाळा उभारणार असून, या शाळांत बालवाडी ते दहावीपर्यंतच्या शिक्षणाची सोय होणार आहे.

राज्यातील विद्यार्थी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणानेयुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी प्रथम दहा आणि आता ९० शाळा राज्यात निवडल्या जात आहेत. यामध्ये रयत शिक्षण संस्थेला चार शाळा उभारण्याची परवानगी मिळाली आहे. सध्या या शाळा सध्याच्या शैक्षणिक सत्रापासून सुरू होणार असून, यावर्षी बालवाडी ते पहिली या वर्गात प्रवेश दिले जाणार आहेत. आजवर प्राथमिक शाळांतून विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता लक्षात घेऊन त्यांना लोकल शिक्षण पारंपरिक पद्धतीने दिले जात होते. आता विद्यार्थ्यांना ‘लोकल ते ग्लोबल शिक्षण’ या आंतरराष्ट्रीय शाळांतून दिले जाणार आहे. तसेच घोकंमपट्टीच्या शिक्षणाला फाटा देऊन त्यांना कृतियुक्त शिक्षण दिले जाणार आहे. केवळ वाचून शिकवण्यातून विद्यार्थ्यांच्या ते प्रभावीपणे लक्षात राहणे मुश्‍कील होते. तेच उदाहरण त्याला कृतीतून प्रयोगाद्वारे शिकविले, त्या शिक्षणाची अनुभूती दिली तर विद्यार्थ्यांच्या ते मनावरच बिंबले जाते. विद्यार्थ्यांना ही पातळी गाठता यावी, त्यातून त्यांच्या विषयाच्या आंतरराष्ट्रीय जाणिवाही बिंबविण्याचे काम या आंतरराष्ट्रीय शिक्षणातून करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांच्या मूलभूत संकल्पनांना वाव देऊन त्यांना मातृभाषेतूनच हे कृतियुक्त शिक्षण दिले जाणार आहे. यासाठी तसे शिक्षकही तयार करण्याची गरज असून, ‘रयत’ मधील चार शाळांचे मुख्याध्यापक आणि १८ शिक्षकांना या शिक्षण पद्धतीचे मुंबईत अभ्यासकेंद्रात शासनाच्या वतीने प्रशिक्षण दिले जात आहे. 

आंतरराष्ट्रीय शाळांचे शिक्षण ‘रयत’मध्ये बालवाडीपासून सुरू होणार आहे. त्यात नर्सरी ते सिनियर केजीचे वर्ग असणार आहेत. यावर्षी बालवाडी अन्‌ पहिलीच्या वर्गाचेही प्रवेश दिले जाणार आहेत. बालवाडीकरिता नर्सरीत तीन ते चार वर्षे वय, केजीमध्ये चार ते पाच, तर सिनियर केजीत पाच ते सहा वयाच्या मुलांना प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याची माहिती संस्थेचे विभागीय अधिकारी कमलाकर महामुनी यांनी दिली. 

साताऱ्यात ‘रयत’च्या अण्णासाहेब कल्याणी विद्यालयात एक अनुदानित आणि एक स्वयंअर्थसहायीत आंतरराष्ट्रीय शाळा बालवाडीसह असणार आहे. तसेच जिजामाता प्रॅक्‍टिसिंग स्कूल येथे एक अशा तीन शाळा असतील. या शाळांत पुढे टप्प्याटप्याने दहावीपर्यंतचे वर्ग सुरू केले जाणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rayat Education Organisation International School Education