‘आरसी बुक’चा प्रवास आता ट्रॅकवर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 एप्रिल 2017

‘आरटीओ’मध्ये नवीन ‘वाहन ४’ प्रणाली सुरू; हेलपाटे थांबणार

सातारा - वाहनांचे नोंदणी पुस्तक (आरसी बुक) मिळण्यासाठी वाहनधारकांची होणारी परवड परिवहन विभागाच्या नवीन ‘वाहन ४’ या प्रणालीमुळे थांबणार आहे. या प्रणालीमुळे वाहनधारकांना आपले आरसी बुक व लायसन्सचा प्रवास कुठेपर्यंत झाला आहे, हे ट्रॅक करता येईल.

‘आरटीओ’मध्ये नवीन ‘वाहन ४’ प्रणाली सुरू; हेलपाटे थांबणार

सातारा - वाहनांचे नोंदणी पुस्तक (आरसी बुक) मिळण्यासाठी वाहनधारकांची होणारी परवड परिवहन विभागाच्या नवीन ‘वाहन ४’ या प्रणालीमुळे थांबणार आहे. या प्रणालीमुळे वाहनधारकांना आपले आरसी बुक व लायसन्सचा प्रवास कुठेपर्यंत झाला आहे, हे ट्रॅक करता येईल.

गेल्या काही वर्षांपासून वाहनधारकाचे आरसी बुक पोस्टाने घरी पाठविण्याची प्रक्रिया उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून राबविली जात आहे. त्यासाठी सुमारे एक महिन्याचा कालावधी वाहनधारकाला सांगितला जातो. मात्र, अनेकांना महिना झाला तरी, आरसी बुक मिळत नाहीत. ते शोधण्यासाठी त्यांना कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात. ‘पोस्ट कार्यालयात विचारा’ अशी उत्तरे मिळाल्यावर वाहनधारकही हेलपाटे मारतो. तेथेही त्यांना व्यवस्थित माहिती मिळत नाही. वाहनधारकाला न मिळाल्यामुळे अनेक आरसी बुक पुन्हा पोस्टाने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात येतात. त्यामुळे सततच्या पाठपुराव्याला कमी पडलेल्या अनेकांची आरसी बुक त्यांना मिळत नाहीत.

वाहनधारकांचा हा त्रास आता नवीन प्रणालीमध्ये बंद होईल. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये नुकतीची ‘वाहन ४’ ही संगणक प्रणाली बसविण्यात आली आहे. त्याने कार्यालयाची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन झाली आहे. या प्रणालीमध्ये कार्यालयातील विविध कामांमध्ये नेमकेपणा व सुलभीकरण आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोणत्याही कामासाठी येणाऱ्या नागरिकांचा मोबाईल क्रमांक आवश्‍यक करण्यात आला आहे. वाहनधारकाचे आरसी बुक तयार होऊन पोस्ट केल्यानंतर प्रणाली एक बारकोड तयार करते. हा बारकोड वाहनधारकाने दिलेल्या मोबाईल क्रमांकावर जातो. या बारकोडच्या आधारे पोस्ट विभागाच्या वेबसाईटवरून (www.indiapost.gov.in) आपल्या आरसी बुकचा प्रवास वाहनधारकाला ट्रेस करता येणार आहे. नव्या बारकोडमुळे आरसी बुकचा हा प्रवास समजणार असल्याने ग्राहकांच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालय तसेच पोस्ट कार्यालयातील फेऱ्या वाचणार आहेत.

दीड हजार आरसी बुक पडून
पूर्वीच्या पद्धतीनुसार पोस्टातून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आलेली सुमारे दीड हजार आरसी बुक पडून आहेत. संबंधित वाहनाचे मालक अद्याप ते घेण्यास आलेले नाहीत. ज्या वाहनधारकांचे आरसी बुक एक महिन्यानंतरही मिळालेले नाहीत, त्यांनी आपल्या ओळखपत्रासह कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी केले आहे.

लायसन्ससाठीही ही सुविधा होणार
लायसन्सच्या संदर्भातील सॉफ्टवेअर अद्याप अपडेट न झाल्याने सध्या केवळ आरसी बुकची माहिती ट्रेस करता येणार आहे. लायसन्ससाठी असणारी ‘सारथी ४’ ही संगणक प्रणाली अपडेट केल्यानंतर वाहनचालकाला आपले लायसनन्सही ऑनलाइन ट्रेस करता येऊ शकेल.

Web Title: rc book journey on track