वाहतूक नियम मोडणाऱ्यांसाठी हवेत प्रबोधनाचे वर्ग! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधल्याने वाचकांनी 'सकाळ'चे आभार मानले असून अनेकांनी सोशल मीडियावर मते व्यक्त केली.

सोलापूर - स्मार्ट सिटीच्या दिशेने जाणाऱ्या सोलापुरातील बेशिस्त वाहतुकीचे ऑन दी स्पॉट रिपोर्टिंग 'सकाळ'मधून प्रसिद्ध झाले. महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधल्याने वाचकांनी 'सकाळ'चे आभार मानले असून अनेकांनी सोशल मीडियावर मते व्यक्त केली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांसाठी प्रबोधन वर्ग सुरू करावेत, अशी वेगळी कल्पना शिक्षक संजीवकुमार कलशेट्टी यांनी मांडली आहे. 

'सकाळ'ने मांडलेल्या अनेक बाबी सत्य आहेत. वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्तींसाठी रोज सायंकाळी प्रबोधन वर्ग घ्यावेत. वर्गात हजर असल्यासच लायसन्स परत द्यावे. यामुळे जनतेत जागृती निर्माण होऊ शकेल, असे संजीवकुमार कलशेट्टी यांनी मत व्यक्त केले. 

वाचकांची मते -
 
चुकीच्या दिशेने वाहन चालवू नये हा प्राथमिक नियम माहीत नसेल असे नाहीत. शिवाजी चौकात रिक्षावाले सर्रास चुकीच्या दिशेने वळतात. हा निव्वळ आडमुठेपणा म्हणावा लागेल. कारवाई करताना पोलिसांकडून दुजाभाव होत आहे. नियम फक्त दुचाकीस्वारांना लावले जात आहेत. 
- त्रिमूर्ती राऊत, नोकरदार 

सरळ जाताना मध्येच यू टर्न घेणे. प्रवासी दिसला की मध्येच वाहन थांबणे ही सोलापुरातील रिक्षावाल्यांची वाईट सवय आहे. यामुळे माझी अनेकदा रिक्षाचालकांसोबत बाचाबाची होत असते. आपण चुकीच्या दिशेने जातोय हे त्यांना केव्हा कळेल देव जाणो. सोलापुरातील वाहतूक पोलिस नाममात्र आहेत. वाहतूक शिस्तीच्या नोकरीपेक्षा वसुली करणे हा यांचा आवडता धंदा आहे. चौका-चौकात थांबून दंड वसूल करणे याशिवाय वाहतूक शाखेला दुसरे काही सुचतच नाही. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी जनजागृती करणेही तितकेच आवश्‍यक आहे. 
- अजीत चौहान, व्यावसायिक 

शिक्षणाचा गंध नाही. अंगात काही कौशल्य नाही. काहीही करण्याची पात्रता नाही नसणारे पोटासाठी रिक्षा चालवणारे रिक्षावाले अनेकजण आहेत. अशा रिक्षाचालकांना वाहतुकीचे आणि माणूस बनण्याचे प्रशिक्षण आवश्‍यक आहे. सगळ्यात पहिल्यांदा इलेक्‍ट्रॉनिक मीटर आणि गणवेश सक्ती नितांत गरजेचे आहे. 
- मनोज बिडकर, नोकरदार 

नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी पैसे वसूल करून सोडले जाते. आरटीओचे अधिकारी फक्त पैसे कमविण्याचे काम करतात असे वाटते. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून स्वत:चा आणि इतरांचा जीव वाचवावा. 
- श्रीनिवाय यन्नम, सामाजिक कार्यकर्ता 

नियम मोडणाऱ्या रिक्षावाल्यांना पोलिसांचे उघड संरक्षण आहे. शहरातील 100 पैकी 90 अपघात रिक्षाचालकांच्या बेशिस्त वाहतुकीमुळे होतात. रिक्षाचालक आपलेच असून त्यांना सभ्यपणा दाखवण्याची गरज आहे. 
- लक्ष्मीकांत बिज्जरगी, नागरिक 

रिक्षाचालकांमुळे वाहतूक कोंडी होत असेल तर सरकारने रिक्षांसाठी वेगळे स्टॉप करावेत. सिटी बससाठी स्टॉप करतात ना मग तसेच रिक्षांसाठीही करावे. रिक्षावाले आरटीओला पैसे देतात ना मग का ओरडता रिक्षावाल्यांच्या नावाने. याला आंधळ दळतय कुत्रं पीठ खातंय असे म्हणावे लागेल. 
- गुरुराज बिराजदार, नागरिक 

अनेक रिक्षाचालकांना नियम माहीत नाहीत. बेशिस्त रिक्षा चालवतात. प्रवाशांना फसवतात. वाइट वागणूक देतात. मीटर नावाचा प्रकार असतो हे त्यांना माहीत नाही. शहरात नवीन कोण आले की बकरा समजून कापतात. ओला सारखी सुंदर सर्व्हिस सगळ्या शहरात ओह. पण इथे आपल्याकडे आंदोलन केले जाते. 
- ब्रिजेश कासट, व्यावसायिक

Web Title: readers opinions about sakal news on traffic rules