सर्पदंशाच्या उपचारासाठी सिव्हील सज्ज - डॉ. पल्लवी सापळे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात जिल्ह्यात सर्पदंशाचे प्रमाण वाढले आहे. या हंगामात सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होते. मात्र, औषधोपचाराची सर्व सुविधा वसंतदादा शासकीय रुग्णालयात सज्ज आहे. अगदी व्हेंटिलेटरपासून रुग्णास गरज पडल्यास पांढरे रक्त देण्याचीही सुविधा आहे, अशी माहिती शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली. 

सांगली - उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात जिल्ह्यात सर्पदंशाचे प्रमाण वाढले आहे. या हंगामात सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होते. मात्र, औषधोपचाराची सर्व सुविधा वसंतदादा शासकीय रुग्णालयात सज्ज आहे. अगदी व्हेंटिलेटरपासून रुग्णास गरज पडल्यास पांढरे रक्त देण्याचीही सुविधा आहे, अशी माहिती शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली. 

साधारणपणे, उन्हाळ्यात सर्पदंशाचे प्रमाण वाढते. त्यापेक्षा पावसाळ्यात शेतीची कामे सुरु होतात. पाणी साठल्यामुळे सर्प बाहेर येतात. त्यामुळे सर्पदंशाचे प्रमाण जास्त असते. गेल्या तीन महिन्यात जवळपास प्रत्येक दिवशी रुग्णालयात सर्पदंश झालेले रुग्ण दाखल झाले आहेत. शासकीय रुग्णालय वगळता स्थानिक रुग्णालयांमध्येही रुग्ण दाखल होतात. त्यामुळे अशा रुग्णांची संख्या जास्त आहे. 

अधिष्ठाता डॉ. सापळे म्हणाल्या, "पावसाळ्यात शेतीची कामे मोठ्या प्रमाणात सुरु होतात. त्यावेळी पाणी साठल्याने सर्प बाहेर येतात. शेतात राहणाऱ्या कुटुंबांना सर्पदंशाचा मोठा धोका असतो. अनेकवेळा अडगळीच्या ठिकाणी, दगडात सर्प असतात. तेथे लहान मुलांसह मोठ्यांनाही सर्पदंश होऊ शकतो. मात्र सगळेच सर्प विषारी नसतात. परंतु, दंश झालेली व्यक्ती घाबरलेली असते. त्यामुळे त्यांना दाखल करुन घेतले जाते.

सर्पदंश दोन प्रकारचे असतात. एकात पॅरालिसिससारखे होते. तर दुसऱ्या प्रकारात अतिरक्तस्त्राव होतो. अशा रुग्णांना व्हेंटिलेटर लावणे, रक्तस्त्राव झाल्यास पांढरे रक्त देणे. अशा सुविधा वसंतदादा शासकीय रुग्णालयात उपलब्ध आहेत. औषधेही उपलब्ध आहेत. नागरिकांनी घरगुती किंवा भोंदुबाबाचे उपचार करु नयेत. असे यावेळी शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठाता, डॉ. पल्लवी सापळे यांनी सांगितले.

Web Title: ready for the treatment of snakebite says dr. pallavi sable