‘गोकुळ’च्या १३ संचालकांचे अध्यक्षांविरोधातच बंड

सदानंद पाटील
बुधवार, 5 डिसेंबर 2018

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’च्या १३ संचालकांनी अध्यक्ष विश्‍वास पाटील यांच्याविरुद्ध बंड केले आहे. श्री. पाटील यांनी राजीनामा दिला नाही तर संघाच्या कामकाजात सहभागी न होण्याचा इशारा दिल्याने गोकुळ वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’च्या १३ संचालकांनी अध्यक्ष विश्‍वास पाटील यांच्याविरुद्ध बंड केले आहे. श्री. पाटील यांनी राजीनामा दिला नाही तर संघाच्या कामकाजात सहभागी न होण्याचा इशारा दिल्याने गोकुळ वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. चेअरमन पाटील यांच्या बाजूने चार संचालक असल्याचे सांगण्यात येत आहे. संचालकांच्या बंडाने चेअरमन बदल लवकरच होईल, अशी शक्‍यता निर्माण झाली आहे. 

जिल्ह्याचे प्रमुख आर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष बदलासाठी दीड वर्षे हालचाली सुरू आहेत. गोकुळची मागील निवडणूक झाल्यापासून विश्‍वास पाटील अध्यक्ष आहेत. सुमारे चार वर्षे ते या पदावर आहेत. गोकुळ अध्यक्षपद साधारण दोन ते अडीच वर्षांसाठी दिले जाते; मात्र पाटील यांचे गोकुळचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पी. एन. पाटील यांच्याशी घनिष्ठ संबंध असल्याने अध्यक्ष बदलाकडे दुर्लक्ष करण्यात आले. पाटील यांच्या काळात झालेल्या गोकुळच्या सर्वच सर्वसाधारण सभा वादग्रस्त झाल्या आहेत. सभा हाताळता न आल्यानेच विरोधक आक्रमक झाले, असा सूर संचालकांनी लावला आहे. 

 तसेच पाटील यांनी राजीनामा न दिल्याने इतर संचालकांवर अन्याय होत असल्याची भावनाही नेत्यांकडे व्यक्‍त केली आहे.
गोकुळ संचालकांनी चार ते पाच वेळा नेत्यांची भेट घेऊन, पाटील यांना बदलण्याची मागणी केली आहे; मात्र नेतेमंडळी दाद देत नसल्याने नाईलाजास्तव संचालकांनी बंड पुकारले आहे. संचालकांच्या मागणीनंतर महाडिक यांनी पाटील यांना दिवाळीपूर्वीच राजीनामा देण्याची सूचना केली होती; मात्र त्याकडे पाटील यांनी दुर्लक्ष केल्याचे काही संचालक सांगत आहेत. पाटील राजीनामा देण्याची काहीच चिन्हे दिसत नसल्याने संघाच्या १७ पैकी १३ संचालकांनी बंडाचे निशाण रोवले आहे. याबाबतचे लेखी पत्र नेत्यांना देईन पाटील यांना बदलण्याची मागणी केली आहे. पाटील यांनी राजीनामा दिला नाही तर संघाच्या कामकाजात भाग न घेण्याचा इशाराही या संचालकांनी दिला आहे. पाटील यांच्या बाजूला सद्यःस्थितीत फक्‍त चार संचालक आहेत. त्यामुळे त्यांना आता कोणत्याही क्षणी राजीनामा द्यावा लागणार असल्याचे गोकुळ वर्तुळातून सांगण्यात येत आहे. 

अध्यक्षपदासाठी तिघे दावेदार
विश्‍वास पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर अध्यक्षपदासाठी तीन ज्येष्ठ संचालकांची दावेदारी आहे. यात रवींद्र आपटे, अरुण डोंगळे व रणजितसिंह पाटील यांचा समावेश आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा विचार करून अध्यक्ष निवड केली जाणार आहे. निवडीत महादेवराव महाडिक यांचा शब्द अंतिम मानला जात आहे.

असा कोणताही प्रकार नाही - अध्यक्ष
गोकुळच्या १३ संचालकांनी चेअरमन बदलासाठी लेखी मागणी केली असून कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे का, याबाबत अध्यक्ष विश्‍वास पाटील यांना विचारले असता असा काही प्रकार नसल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Rebellion against Gokul President