बनावट चलनाने जत तालुक्यात वाहनचालकांकडून दंड वसूल

बनावट चलनाने जत तालुक्यात वाहनचालकांकडून दंड वसूल

जत - अवैध वाळू उपशाबद्दल दंडाच्या रकमेची बनावट चलने तयार करून महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी २२ लाखांचा गैरव्यवहार केल्याचे उघडकीस आले आहे. प्रकरणाची चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी  मागणी पाच वाहनधारकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. 

त्यामुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. किरण जोत्यापा बेळुंखी, नागेश चंदर पांढरे, संतोष शंकर  पांढरे, दादासाहेब नामदेव हिप्परकर, अरुण शंकर बिराजदार अशी तक्रारदारांची नावे आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की आमच्या मालकीची ट्रक, डंपर अशी वाहने आहेत. या वाहनातून विना परवाना वाळू, गौण खनिज वाहतूक केली म्हणून वाहने जप्त करून तहसील कार्यालय (जत) व अप्पर तहसीलदार कार्यालय (संख) येथे लावली. 

आम्हाला कारणे दाखवा नोटिसाही दिल्या होत्या. दंडाची रक्कम भरण्यासाठी जत कार्यालयातील कारकून लक्ष्मण भवर व संखचा कारकून बागल यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी चलन तयार करून दिले. त्यावेळी प्रांत कार्यालयातील कारकून बिपीन मुंगळीकर यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर भवर यांनी हृषीकेश तानगे ऊर्फ दत्ता मोरे यांना आमच्याकडे पाठवून दिले. लवकरात लवकर वाहने सोडण्याचा निरोप दिला. त्याच्यासाठी जादा रक्कम दिली. 

चलन व दंडाची रक्कम तानगे यांच्या सूचनेनुसार मुगळीकर यांना दिली. त्यावेळी त्यांनी कवठेमहांकाळला जाऊन नोटरी समक्ष बंधपत्र तयार करून आणण्यास सांगितले. बंधपत्र आणून दिल्यानंतर रक्कम भरलेली चलन जोडून गाडी सोडण्याचा उपविभागीय अधिकाऱ्यांचा आदेश दिला. अरुण बिराजदार हे वाहने आणण्यासाठी संखला गेले. तेथे महसूल विभागाच्या खात्यावर रक्कम जमा नसल्याचे दिसले. त्यानंतर चौकशी केली असता बनावट चलन तयार करून दिल्याचे स्पष्ट झाले. 

प्रकरणाच्या चौकशीची मागणी
मुंगळीकर व भवर यांनी बोगस चलन तयार करून त्यावर बॅंकेचा बोगस शिक्का मारून दिल्याचे स्पष्ट झाले.  दंडाची २२ लाख ५० हजारांची रक्कम शासकीय खजिन्यात जमा न करता परस्पर हडप केली आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी व संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com