कोल्हापुरी फुटबॉलला ‘रेड कार्ड’च

युवराज पाटील
बुधवार, 22 मे 2019

कोल्हापूर - कोल्हापूरच्या फुटबॉल हंगामाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. मे महिन्याअखेरीस तसेच जूनच्या पहिल्या आठवड्यात कोणताही चषक होण्याची शक्‍यता नसल्याने ‘भेटू आता पुढील हंगामात’ असेच म्हणण्याची वेळ फुटबॉल खेळाडू तसेच शौकिनांवर आली आहे.

कोल्हापूर - कोल्हापूरच्या फुटबॉल हंगामाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. मे महिन्याअखेरीस तसेच जूनच्या पहिल्या आठवड्यात कोणताही चषक होण्याची शक्‍यता नसल्याने ‘भेटू आता पुढील हंगामात’ असेच म्हणण्याची वेळ फुटबॉल खेळाडू तसेच शौकिनांवर आली आहे. किमान एखादी तरी स्पर्धा हंगाम संपताना होईल, अशी आशा होती; मात्र पावसाळा तोंडावर आल्याने ही शक्‍यताही आता मावळली आहे. 

दरम्‍यान हुल्लडबाजीचे एखाद्या खेळावर काय परिणाम होऊ शकतात, त्यातून फुटबॉल संघ, तसेच खेळाडूंचे किती नुकसान होऊ शकते, याचा अनुभव या खेळाशी संबंधित सर्वच घटकांनी यंदा घेतला. 

तोडफोड करणारे करून गेले. त्याची शिक्षाही काहीजण भोगत आहेत; मात्र ठराविक टोळक्‍यांमुळे खेळाचे किती नुकसान होते, याचीच प्रचिती यानिमित्ताने आली. लाखोंच्या घरात बक्षिसाची रक्कम, वैयक्तिक बक्षिसांची तर लयलूट असे ‘अच्छे दिन’ खेळाला आले असताना प्रेक्षक गॅलरीतून बाटल्या फेकणारे, अर्वाच्य शब्दात शिवीगाळ करणारे आणि त्यांना प्रोत्साहन देणारे काही खेळाडू यामुळे फुटबॉल हंगाम पूर्ण न होताच अर्ध्यावर बंद होत आहे. केएसए लीग त्यानंतर अस्मिता चषक, राजेश चषक, अटल चषक आणि ज्या चषकाला हुल्लडबाजांमुळे गालबोट लागले तो चंद्रकात चषक एवढ्यापुरताच हंगाम मर्यादित राहिला.

लोकसभेचे मतदान होईपर्यंत पोलिस बंदोबस्त देणार नाही, अशी भूमिका पोलिस प्रशासनाने घेतली होती. २३ एप्रिलला मतदान झाले. त्यानंतर नव्या आचारसंहितेसह स्पर्धा पुन्हा सुरू होईल, अशी अपेक्षा होती. गुरुवारी (ता.२३) लोकसभेची मतमोजणी होत आहे. पोलिस यंत्रणा त्यात व्यस्त आहे. त्यामुळे निकालानंतरही अनुचित प्रकार घडल्यास त्यात पोलिस व्यस्त राहतील. सर्व बाबींचा विचार करता हंगाम आटोपता घेतल्याचे चित्र आहे. 

२००३ मध्ये असाच हुल्लडबाजीचा प्रकार घडला होता. नंतर संबंधित चषक कायमचा बंद पडला. १६ वर्षांनंतर तिच वेळ या वेळी पुन्हा एकदा येऊन ठेपली. वरिष्ठ फुटबॉल संघांनी जी गुंतवणूक केली होती, ती या निमित्ताने वाया गेली. ज्या खेळाडूंशी करार केला, त्यांनाही खेळायची संधी मिळाली नाही. परराज्यातील खेलाडूंसाठी पैसे मोजले गेले होते. त्याचा फटका संघांना बसला. प्रत्येक स्पर्धेत काहीतरी वेगळा खेळ करून कौशल्य दाखविण्याची संधी खेळाडूंना मिळते. ती संधीही या वेळी मिळाली नाही. स्पर्धा नसल्याने खेळाडू, प्रशिक्षक, व्यवस्थापक यांना सक्तीची विश्रांती मिळाली. 

‘क’ गटातील स्पर्धाही अशीच हुल्लडबाजीमुळे बंद आहे. सुमारे तीन हजारांहून अधिक खेळाडू या खेळाशी जोडले गेले आहेत. यंदाच्या तिन्ही स्पर्धेला दृष्ट लागेल अशी गर्दी झाली होती. डोक्‍यावरील तळपत्या उन्हाची पर्वा न करता प्रेक्षक केवळ चांगला खेळ पाहायला मिळतो, या आशेवर येत होते. त्यांचीही निराशा झाली.

केएसला नाईलजाने स्पर्धा स्थगित ठेवावी लागली. महासंग्राम तसेच सतेज चषकासाठी केएसएकडे नोंदणी होती. हंगामाचा शेवट पाहता याही स्पर्धा होण्याची शक्‍यता दिसत नाही. त्यामुळे दिवाळीनंतर नव्या आचारसंहितेनुसार केएसए लीगला सुरवात होईल. जानेवारी २०२० पासून बाद पद्धतीच्या स्पर्धेला सुरवात होईल.

रॉयल फॅमिलीचे योगदान
श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, खासदार संभाजीराजे, केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे, मधुरिमाराजे यांनी कोल्हापूरचा फुटबॉल वाढावा त्यातून परगावच्या व्यावसायिक संघात संधी मिळावी, यासाठी योगदान दिले. फुटबॉलचा विकास हेच त्यांचे ध्येय राहिले. तालीम आणि पेठांच्या इर्षेत मूठभर हुल्लडबाजांनी हंगामाला गालबोट लावले. त्याचे परिणाम सर्वांनाच सहन करावे लागले.

आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर स्पर्धेला परवानगी द्यायची की नाही, याचा विचार होऊ शकतो; मात्र एखादा तरी वळवाचा पाऊस येऊन गेला, तर पुढे दोन दिवस सामन्यासाठी मैदान उपलब्ध होत नाही. पावसाळ्यापूर्वीचे कसेबसे १५ दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे नव्या स्पर्धेला परवानगी देण्याची शक्‍यता जवळजवळ नाही.
- मालोजीराजे छत्रपती,
अध्यक्ष. केएसए

खेळाची आचारसंहिता आज जाहीर होणार
यापुढे मैदानावर खेळाडूंचे, संघांचे आणि प्रेक्षकांचे वर्तन कसे असेल, यासंबंधी नवी आचारसंहिता केएसएने तयार केली आहे. फुटबॉलशी संबंधित घटकांशी चर्चा करून आचारसंहिता तयार झाली आहे. यात नेमक्‍या कोणत्या अटी आणि नियम आहेत, हे उद्या (ता.२२) जाहीर होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Red card to Kolhapur Football