गलाट्यांच्या फुलांचा पुरवठा कमी; दरही कमी होईना

घनशाम नवाथे 
Tuesday, 2 February 2021

दसऱ्यापासून फुलांचा वाढलेला दर अजूनही टिकून आहे. याचे कारण गलाट्यांवर पडत असलेला रोग. या लाल कोळी रोगामुळे गलाट्यांची फुलं मार्केटमध्ये पाहिजे तितकी येईनात आणि पुरवठा कमी, किंमत जास्त या नियमाने त्यांचा दरही कमी होईना. 

माधवनगर : दसऱ्यापासून फुलांचा वाढलेला दर अजूनही टिकून आहे. याचे कारण गलाट्यांवर पडत असलेला रोग. या लाल कोळी रोगामुळे गलाट्यांची फुलं मार्केटमध्ये पाहिजे तितकी येईनात आणि पुरवठा कमी, किंमत जास्त या नियमाने त्यांचा दरही कमी होईना. 

एरवी फुलांना मागणी नसते. त्यामुळे फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळतो तो दसऱ्यादिवशी आणि त्यानंतर येणाऱ्या सणासुदीच्या दिवसातच. दसऱ्याला फुलांचे दर वाढतात. पण काही दिवसांनी ते पुन्हा खाली येऊन स्थिर होतात. पण यंदा गलाट्यांवर लाल कोळी रोग पडल्यामुळे पुरवठाच कमी आला आहे आणि परिणामी दर कमी झाले नाहीत. मार्केटमध्ये फुलांना अजूनही चांगला दर मिळत असल्याची माहिती फुलविक्रेत्यांनी दिली. 

आज किलोला फुलांचे दर स्थिर आहेत. गलाटा 50 रुपये, निशिगंध 200 रुपये, झेंडू 50 रुपये, गुलाब 100 नगाला 150 रुपये, गजरा 400 रुपये किलो असे दर आहेत. दिवाळीत झेंडूचा दर किलोला 130 रुपयांपर्यंत गेला होता, अशी माहिती माधवनगरमधील फूल विक्रेते प्रकाश माळी यांनी दिली. 

तासगाव भागातून गुलाब मार्केटला येतो. इतर फुले मालगाव, बेंद्री, वसगडे, आरग, बेडग, लिंगनूर या मिरज पूर्व भागातून येतात. मिरजेतील होलसेल मार्केटमधून विक्रेते जिल्हाभर फुले नेत असतात. 

गलाट्यांचा दर या दिवसांत 25 ते 30 रुपये किलो असतो. पण रोग पडल्यामुळे माल कमी आहे. परिणामी हा दर आज 50 रुपये किलो आहे. इतर फुलांच्या किमतीतही फारसा फरक झाला नाही. त्यामुळे पुष्पहार, गुच्छ, गजऱ्यांचे दरही वाढून स्थिर झाले आहेत. 
- प्रकाश माळी, फुलविक्रेते

 

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reduced supply of gallstones; The rate did not decrease