आरोग्य सभापती लेवेंच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांचा कामाला अल्पविराम! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

सातारा - पालिकेचे आरोग्य समितीचे सभापती वसंत लेवे यांच्या कार्यपद्धतीविषयी नाराजी व्यक्त करत आज पालिका कर्मचाऱ्यांनी लेवेंच्या निषेधार्थ सकाळी काही काळासाठी कामबंद आंदोलन केले. पदाधिकारी व प्रशासनाने संघटनेशी चर्चा केल्यानंतर दुपारपासून कर्मचारी पुन्हा कामावर हजर झाले. 

सातारा - पालिकेचे आरोग्य समितीचे सभापती वसंत लेवे यांच्या कार्यपद्धतीविषयी नाराजी व्यक्त करत आज पालिका कर्मचाऱ्यांनी लेवेंच्या निषेधार्थ सकाळी काही काळासाठी कामबंद आंदोलन केले. पदाधिकारी व प्रशासनाने संघटनेशी चर्चा केल्यानंतर दुपारपासून कर्मचारी पुन्हा कामावर हजर झाले. 

दरम्यान, सभापतीकडून यापुढे कर्मचाऱ्यांना दमदाटीचे प्रकार झाले, तर आरोग्य कर्मचारी बेमुदत संपावर जातील, असा इशारा सातारा म्युनिसिपल कामगार युनियनचे नेते शिवाजीराव पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. पालिका कर्मचारी आज सकाळी कामावर न जाता पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारात जमले. त्यांनी काम बंद आंदोलन पुकारत आरोग्य समितीचे सभापती लेवे यांचा निषेध केला. जे कर्मचारी काम करत नसतील, तर त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. दहा मिनिटे उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा खडा मांडू नये, तसेच कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत, त्या मागण्यांचाही पालिका पदाधिकाऱ्यांनी विचार करावा, अशी मागणी पवार यांनी केली. 

दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या दालनात पदाधिकारी, अधिकारी व कामगार संघटना पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या वेळी नगराध्यक्षा कदम, पालिकेचे उपाध्यक्ष राजू भोसले, लेखापाल विवेक जाधव, नगरअभियंता भाऊसाहेब पाटील, कामगार संघटनेचे दिलीप भोसले, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक एस. एम. साखरे आदी उपस्थित होते. या वेळी झालेल्या चर्चेअंती कामगारांना सकाळी कामावर येण्यास 15 मिनिटांची सवलत देण्याचे ठरले. तथापि, ही सवलत महिन्यातून केवळ तीन वेळाच मिळेल, असेही या वेळी ठरले. चर्चेअंती सामोपचाराने आंदोलन मागे घेण्यात आले. दुपारनंतर कामगार कामावर हजर झाले. 

माझे काम मी करतो; तुमचे तुम्ही करा : वसंत लेवे 
गेली दहा वर्षे पालिकेत मनोमिलन होते. त्याप्रमाणेच काम करण्याची पद्धत आता चालून देणार नाही. "स्वच्छ सातारा, सुंदर सातारा' हे आपले नेते खासदार उदयनराजे भोसले यांचे ब्रीद आहे. लोकांनी त्यासाठी पदाधिकाऱ्यांना निवडून दिले आहे. कर्मचाऱ्यांनी वेळेत यावे. अंगावर गणवेश, हातात हत्यारे असावीत. संस्थेशी प्रामाणिक राहून, नियमानुसार काम व्हावे, याचा आग्रह मी धरला. पैसे घेऊन हजेरी लावण्याची पद्धत बंद केली, तर त्यात चुकलं कुठं! या शिस्तीचा कोणाला त्रास होत असेल तर होऊ दे. काम करण्याची मानसिकता सर्वांना ठेवावी लागेल. सभापती या नात्याने माझे काम मी करतोय. माझी बांधिलकी शहरातील जनतेशी आहे. कामात कोठेही तडजोड करणार नाही, अशा स्पष्ट व ठाम शब्दात आरोग्य सभापती वसंत लेवे यांनी आपले म्हणणे "सकाळ'शी बोलताना मांडले. 

Web Title: Regarding the functioning of Vasant Leve