साताऱ्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सिद्धार्थ लाटकर
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

फुले, शाहू, आंबेडकर, आम्ही सारे दाभोलकर अशा घोषणा देत अंधश्रद्धा निर्मूलन समिती व विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडला. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा सूत्रधार सरकारने शोधावा तसेच सनातन संस्थेवर बंदी घालावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांना निवेदनाद्वारे केली.

सातारा- फुले, शाहू, आंबेडकर, आम्ही सारे दाभोलकर अशा घोषणा देत अंधश्रद्धा निर्मूलन समिती व विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडला. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा सूत्रधार सरकारने शोधावा तसेच सनातन संस्थेवर बंदी घालावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांना निवेदनाद्वारे केली.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला आज (सोमवारी) पाच वर्षे पूर्ण झाली. या कालावधीत खुनाचा योग्य त्या दिशेने तपास झाला नाही. त्यामुळे राज्यभरात निषेध, आंदोलने होत आहेत. राजवाड्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत अंनिससह विविध संस्था, संघटनांच्या कार्यकर्त्यांनी निर्भय मॉर्निंग वॉक काढून सरकारला खुनाचा सूत्रधार कोण? त्याला केव्हा पकडणार असा जाब विचारला. विवेकाचा आवाज बुलंद करू, अशा घोषणा ही देण्यात आल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर डॉ. दाभोलकर, गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचा खून झाला, पण त्यांचे विचार संपले नाहीत, अशी भावना विविध वक्‍त्यांनी व्यक्त केली. विचारवंत संपू नयेत यासाठी समाजाने जागरुक राहिले पाहिजे असे मत युवक-युवतींनी व्यक्त केले. यावेळी भगवान रणदिवे, चंद्रकांत नलवडे, विजय मांडके, आनंदा सणस, सीताराम चाळके, प्रकाश माने, जयप्रकाश जाधव, गौतम वाळिंबे, डॉ. प्रसन्न दाभोलकर, सुभाष जाजू, विजय पवार आदी उपस्थित होते.

Web Title: Regarding the request letter of District collector from ANIS in satara