नियमन वाहतुकीचे की व्यसन उत्पन्नवाढीचे...

नियमन वाहतुकीचे की व्यसन उत्पन्नवाढीचे...

अस्ताव्यस्त पार्किंगला आळा घालण्यासाठी शहर वाहतूक शाखेची टोईंग क्रेन सुरू आहे. आता शाहूपुरी पोलिस ठाण्यांतर्गतही टोईंग क्रेन दाखल झाली आहे. त्यातून पार्किंगमधील त्रुटी दूर करून काटेकोर व्यवस्था होणे अपेक्षित आहे. नागरिकांकडून दंड वसुलीसाठीच आपली नेमणूक झालीय, असे वर्तणूक बहुतांश कर्मचाऱ्यांकडून होत आहे. त्यामुळे वाहतूक नियमनाला प्राधान्य देताना उत्पन्नवाढीच्या व्यसनातून कर्मचाऱ्यांची सोडवणूक करण्याचे प्रयत्नही अधीक्षकांकडून आवश्‍यक आहेत. 

नियम काय ते मोडण्यासाठीच असतात... असे कधी कधी विनोदाने म्हटले जाते. पण, जेव्हा नियमांना खुलेआम पायदळी तुडवले जाते, तेव्हा नियमांची काटेकोर अंमलबजावणी अपेक्षित असते. कधी तसे घडतेही तर कधी नियमांचा धाक दाखवून अन्य हेतू साध्य केले जातात, हेही तितकेच सत्य आहे. त्याचा अनुभव अनेकांना वाहतूक पोलिसांकडून येत असतो.
वाहतूक नियमनासाठी वाहतूक शाखेची स्वतंत्र शाखा कार्यरत झाल्यावर, सुरवातीला मुख्य चौकात उभ्या राहणाऱ्या वाहतूक पोलिसाचा धाक वाटायचा. पुढे शहरात सिग्नल यंत्रणा कार्यरत झाली. रडतखडत का होईना ही सिग्नल यंत्रणा ‘सैराट’पणे धावणाऱ्या साताऱ्याच्या पचनी पडू लागली. जसजसे वाहतुकीचे प्रमाण वाढत गेले, नवे चौक नावारूपास येऊ लागले, तसतसे वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांची संख्या वाढून ते कर्मचारी शहरातील अन्य चौकांमध्येही दिसू लागले. मात्र, डोळ्यासमोर वाहतूक कोंडी होत असताना, हातातील पावती पुस्तक लिहून दंड वसुली करण्यातच ते बऱ्याचदा मग्न दिसतात. नव्याने कर्तव्यावर हजर झालेले युवा कर्मचारी ‘स्टाइल’मध्ये आपले स्वत:चे वाहन चौकातच लावून दोन-चार मित्र वा मैत्रिणींचे कोंडाळे करून गप्पांमध्ये मश्‍गुल दिसतात. त्यामुळे वाहतूक कर्मचारी म्हणजे ‘हाय काय, न्हाय काय?’ अशी लोकांची धारणा झाल्याचेही जाणवते. 

टोईंग क्रेनवरील कर्मचाऱ्यांकडूनही अनेकदा उत्पन्नवाढीसाठी तसेच काहीसे घडताना दिसते. सातारा शहरात जिल्हाभरातून लोक येत असतात. पर्यटकांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा स्थितीत त्यांनी आणलेली वाहने बऱ्याचदा अन्य लोकांनी लावलेली वाहने पाहून लावली जातात. त्यांना शहरातील सर्व स्थितीची माहिती नसते. अनेक ठिकाणी सूचना फलक कुठेतरी दिसेनाशा स्थितीत लावलेले असतात. त्यातून कधी कधी ती वाहने पार्किंग हद्दीबाहेर उभी राहतात. अशी वाहने उचलली जातात. त्यामुळे पार्किंग-नो पार्किंगचे फलक लावणे व पार्किंगचे पट्टे मारणे आवश्‍यक आहे. तरच शहराबाहेरून येणाऱ्या व शहरातील नागरिकांचा त्रास वाचू शकतो. कायद्याची कटकट वाटणार नाही.

शाहूपुरी पोलिस ठाण्यात नवी क्रेन दाखल झाली आहे. या क्रेनच्या कारवाईच्या मार्गावरही पार्किंगचे फलक तसेच पट्टे मारण्याचे काम अगोदर झाले पाहिजे, अन्यथा नागरिक व पोलिसांच्यात वाद होणार हे नक्की. ते टाळण्यासाठी वाहतूक शाखा व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने पुढाकार घेतला पाहिजे. दंड वसुली ऐवजी वाहतूक नियमन हा वाहतूक शाखेचा मुख्य उद्देश अपेक्षित आहे.

रात्रीस खेळ चाले...
शहरातून मुंबई वा अन्य मार्गांवर धावणाऱ्या आराम बस रात्रीच्यावेळी बस स्थानकाबाहेर येऊन उभ्या राहतात. मग, त्या बससह त्यांचे एजंटही बस स्थानक परिसरात कुठेही उभे राहून, चारचौघांचे कोंडाळे करून वाहतुकीला अडथळा होईल, अशा प्रकारे वर्तन करतात. रात्रीच्या वेळी त्यांची दंगा-मस्ती टिपेला पोचते आणि बस स्थानकाशेजारचे सर्वच वातावरण अस्वस्थ होते. त्याकडेही पोलिस दलाने लक्ष देणे आवश्‍यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com