अग्रणीचे पुनरुज्जीवन : मिलाफ लोकसहभाग आणि प्रशासनाचा

दीपक पवार
Wednesday, 4 November 2020

खानापूर तालुक्‍याच्या घाटमाथ्यावरील अग्रणी नदी आठ वर्षांपूर्वी लोकसहभागातून पुनरुज्जीवन करण्यास हाती घेतली. त्यास प्रशासनाने उत्तम साथ दिली.

आळसंद (जि. सांगली) : खानापूर तालुक्‍याच्या घाटमाथ्यावरील अग्रणी नदी आठ वर्षांपूर्वी लोकसहभागातून पुनरुज्जीवन करण्यास हाती घेतली. त्यास प्रशासनाने उत्तम साथ दिली.

बळिराजा स्मृतीधरणच्या धर्तीवर अग्रणी नदीवर धरणे बांधायला हवीत, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते भीमराव सूर्यवंशी, रावसाहेब शिंदे, मालोजीराव शिंदे यांची संपतराव पवार यांच्याकडे सतत असायची. त्यातूनच 2013 मध्ये श्री. पवार व त्यांच्या सहकार्यांनी जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांच्या मार्गदर्शनाखाली अग्रणी नदी प्रवाहित करण्याची मोहीम हाती घेतली.

बलवडीतील गायकवाड मळ्यात पहिल्या बंधाऱ्याचे भूमिपूजन तत्कालीन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी केले. त्या वेळी राजेंद्रसिंह राणा, आमदार मोहनराव कदम, राजेंद्र मदने यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. विलास चौथाई यांनी बंधाऱ्याचा आराखडा करून दिला. केवळ सहा लाख रुपयांत बंधारा पूर्णत्वास आला. लोकसहभागातून बंधाऱ्याची निर्मिती होऊ शकते, त्याचा प्रत्यय लोकांना आला.

पुढे लोकांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. शासनातर्फे जलयुक्त अभियानांतर्गत तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार अंजली मोरड यांनी कामास गती दिली. तत्कालीन उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील, आमदार अनिल बाबर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुहास शिंदे, डॉ. रवींद्र व्होरो, प्रसन्न कुलकर्णी आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी याकामी मोलाचे योगदान दिले.

शिवाजी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत जिल्ह्यातील महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी श्रमदान केले. विविध संघटना, चळवळींच्या कार्यकर्त्यांनी झोकून देऊन कामात सहभाग घेतला.

प्रशासनातील अधिकाऱ्यांनी निष्ठेने काम केले. तालुक्‍यातील सहकारी संस्थांनी आर्थिक मदतीचा हात दिला. 15 दिवसांपूर्वी परतीच्या पावसाने अग्रणी नदी ओसंडून वाहत आहे. नदीवरील बंधारे पाण्याने तुडुंब भरले असून, शेतकरी आनंदात आहेत. 

लोकांची उत्तम साथ मिळाली

अग्रणी नदी पुनरुज्जीवनास लोकांची उत्तम साथ मिळाली. प्रशासनानेही झोकून देऊन काम केले. लोकांचा सहभाग व प्रशासनाची चांगली साथ मिळाल्यास लोकाभिमुख कामे करता येतात, हे "अग्रणी'च्या कामातून दिसून येते. भारत सरकारच्या जलशक्ती विभागाने याची दखल घेतली, हे स्वागतार्ह आहे. 
- संपतराव पवार, सामाजिक कार्यकर्ते, बलवडी भा. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rehabilitation of Agrani River : a combination of public participation and governance