‘खाकीतली ती’ जेव्हा रॅम्पवर अधिराज्य करते...

संजय गणेशकर
शुक्रवार, 26 जुलै 2019

पलूस - लहानपणी पाहिलेली स्वप्नं मोठेपणी अपूर्णच राहतात, असं नाही. ‘लोक काय म्हणतील’ याचा विचार न करता जगण्याचा पुरेपूर आनंद घेणारे लोक इतरांचे आयुष्यही सुगंधित करतात. अशाच एक आहेत पलूस तालुक्‍यातील पुणदीच्या व सध्या पुणे पोलिस दलात विशेष शाखेच्या सहायक पोलिस निरीक्षक प्रेमा विघ्नेश पाटील. ज्यांच्यामुळे महिला पोलिसांचे मनोधैर्य उंचावले आहे.

पलूस - लहानपणी पाहिलेली स्वप्नं मोठेपणी अपूर्णच राहतात, असं नाही. ‘लोक काय म्हणतील’ याचा विचार न करता जगण्याचा पुरेपूर आनंद घेणारे लोक इतरांचे आयुष्यही सुगंधित करतात. अशाच एक आहेत पलूस तालुक्‍यातील पुणदीच्या व सध्या पुणे पोलिस दलात विशेष शाखेच्या सहायक पोलिस निरीक्षक प्रेमा विघ्नेश पाटील. ज्यांच्यामुळे महिला पोलिसांचे मनोधैर्य उंचावले आहे. त्याचे कारणही विशेष आहे. त्यांनी व्यावसायिक मॉडेलना मागे टाकत ‘रिनिंग मिसेस इंडिया २०१९’ किताब पटकावला. 

पुणदी या लहानशा गावात जन्मलेल्या प्रेमा या सुंदर आहेतच. पण बुद्धिमान व कर्तव्यनिष्ठही आहेत. सन २०११ पासून त्या पोलिस दलात आहेत. घरी साधे वातावरण असताना. घरी कोणी मॉडेलिंगच काय फॅशन शो ही न पाहिलेले. महावितरणमध्ये कर्मचारी असलेले वडील, गृहिणी आई व दोन भाऊ असं माहेर. पती  विघ्नेश व दोन वर्षांचा मुलगा रणविजय. या  गोतावळ्याला सांभाळत त्या पोलिस दलात कार्यरत आहेत. नेटके असण्याची आणि सुंदर दिसण्याची आवड मुलींना जात्याच असते. पण स्पर्धेत भाग घ्यायचा विचार मनात येत नाही. शिवाय पोलिस कठोर असतात हा विचारही त्यांना मागे खेचतो. 
पतींनी आग्रह केला म्हणून फेसबुकवरून नोंदणी केली. ही नोंदणी सुरवात होती एका मोठ्या प्रवासाची. 

दूरध्वनीवरून मुलाखती झाल्या. प्रत्यक्ष तीन दिवसांचे ग्रूमिंग सेशन झाले. अगदी कसे चालायचे, हसायचे असे नियम सांगण्यात आले. एकदा ठरलं, की ते तडीस न्यायचंच या स्वभावानुसार त्यांनीही स्पर्धा मनावर  घेतली. उंच टाचांची सॅंडल्स घालायचा सराव घरातही केला. कोरिओग्राफरकडून जुजबी नृत्यही शिकल्या. पाठोपाठ होणाऱ्या फेऱ्या त्यांनी लीलया पार केल्या. अखेर स्पर्धेचा दिवस उजाडला. अंतिम स्पर्धकांत त्यांच्यासह मातब्बर होते. 

परीक्षकांनी विचारलेला शेवटचा प्रश्न होता ‘तुमचा स्टाईल आयकॉन कोण? त्यावर त्या क्षणाचाही विलंब न करता उत्तरल्या ‘किरण बेदी’ मी त्यांना बघूनच पोलिस दलात आले. अर्थात त्यांचे हे उत्तर परीक्षकांना आवडले. त्या विजेत्या ठरल्या. ‘वूमन विथ सबस्टन्स’ किताबानेही त्यांना गौरवण्यात आले. 

त्यांच्या आजवरच्या प्रवासात खंबीर होते दोन पुरुष. एक वडील व दुसरे पती. वडिलांनी पोलिस दलात जाण्यात आडकाठी न आणता मोकळीक दिली. पतीने स्पर्धेवेळी ‘तू हे करू शकतेस’ असा विश्वास  दिला. ‘मला वेळ नाही’ अशी तक्रार करणाऱ्या महिलांसाठी त्यांचे उदाहरण मोठेच आहेत. सुरवातीला त्याही असा विचार करत. मात्र सुरवात केली आणि ध्येय गाठले. 
स्पर्धा जिंकल्याचे समजताच पोलिस दलाने कौतुक केले. माहिती नसणाऱ्या अधिकाऱ्यांनीही आपुलकी, अभिमानाने स्टेट्‌स ठेऊन अभिनंदन केले. घरच्यांसह पुणे पोलिसांनाही त्यांच्या कामगिरीचा अभिमान वाटतोय.  

‘स्वतःसाठी वेळ द्या. अशक्‍य काही नाही. मी नियमित व्यायाम करते. आवडेल त्या प्रकारात. अनेकदा २४ तास काम करावं लागतं. पण व्यायाम, स्वतःसाठी वेळ देणं थांबवलं नाही. स्वतःशी संवाद सुरूच ठेवला आणि इथं पोचले. आयुष्य एकदाच मिळतं. आवडत्या गोष्टींना मिस का करायचं? अफाट इच्छाशक्तीपुढे आकाशही झुकू शकते. गरज 
आहे संकल्पाची.’’ 
-प्रेमा पाटील,
पुणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reigning Mrs. INDIA 2019 PSI Prema Patil special story