हा तर सोलापूरकरांचा सन्मान!

परशुराम कोकणे
रविवार, 1 जुलै 2018

मूळचे सोलापूरचे असलेले आयपीएस अधिकारी दत्ता पडसलगीकर यांना राज्याच्या पोलिस महासंचालकपदी बढती देण्यात आल्याने सोलापूरकरांत आनंदाचे वातावरण आहे. हा सोलापूरकरांचा सन्मान असल्याची भावना सोलापुरातील पडसलगीकर कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. ​

सोलापूर : मूळचे सोलापूरचे असलेले आयपीएस अधिकारी दत्ता पडसलगीकर यांना राज्याच्या पोलिस महासंचालकपदी बढती देण्यात आल्याने सोलापूरकरांत आनंदाचे वातावरण आहे. हा सोलापूरकरांचा सन्मान असल्याची भावना सोलापुरातील पडसलगीकर कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. 

दत्ता पडसलगीकर यांचे वडील डी. व्ही. पडसलगीकर हे सैन्य दलात होते. ते कर्नल पदावरून निवृत्त झाले. चारच महिन्यांपूर्वी त्यांचे निधन झाले. नवी पेठ परिसरात पडसलगीकर यांचे घर असून तेथे सध्या काका राहतात. पडसलगीकर यांचे आजोबा व्यंकटेश पडसलगीकर हे सोलापूर नगरपालिकेत मुख्याधिकारी होते. ते मूळचे कर्नाटकातील पडसलगी गावचे. नोकरीच्या निमित्ताने सोलापुरात आले. त्यांच्यानंतर पडसलगीकर परिवार सोलापूरचा झाला. दत्ता पडसलगीकर यांचे शिक्षण सोलापुरात सेंट जोसेफ शाळेत झाले. त्यानंतर पुढील शिक्षण पुण्यात झाले. 

2016 मध्ये पडसलगीकर यांची मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी वर्णी लागली होती. त्याआधी सुमारे 10 वर्षे आयबीमध्ये त्यांनी सेवा बजावली. पडसलगीकर हे 1982 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी नागपूर, कराड आणि नाशिकमध्ये अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळलेली आहे. उस्मानाबाद आणि साताऱ्याचे ते अधीक्षक होते. मुंबईत पोलिस उपायुक्त म्हणूनही त्यांनी काम पाहिले. पोलिस दलातील उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना राष्ट्रपती पदकानेही सन्मानित करण्यात आले आहे. पोलिस महासंचालक सतीश माथुर यांच्या निवृत्तीनंतर दत्ता पडसलगीकर हे पोलिस महासंचालक स्तरावरील सर्वात वरिष्ठ अधिकारी आहेत. 31 ऑगस्ट 2018 ही त्यांच्या निवृत्तीची तारीख असून आजच्या नियुक्तीनंतर दोनच महिन्यांचा कालावधी उरल्याने त्यांना मुदतवाढ मिळण्याची शक्‍यता आहे. 

दत्ता पडसलगीकर हे माझे पुतणे. अविश्रांत काम करणारा व्यक्ती म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. घरगुती कार्यक्रमांचे निमित्ताने त्यांचे सोलापूरला येणे जाणे असते. 
आधीपासूनच काम हेच त्यांचे सूत्र राहिले आहे. पोलिस महासंचालकपदी बढती मिळाल्याने कुटुंबीय, नातेवाइकांत आनंदाचे वातावरण आहे, असे मत दत्ता पडसलगीकर यांचे काका जयंत पडसलगीकर यांनी व्यक्त केले आहे.

अगदी शालेय वयापासून दत्ता पडसलगीकर हे अभ्यासू वृत्तीचे आहेत. त्यांचे वडील सैन्य दलात असल्याने महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच त्यांनी देशसेवेत येण्याचा निर्णय घेतला होता. सर्वांना मदत करणारा, कमी बोलणारा, सरळ मनाचा माणूस म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. - डॉ. ए. व्ही. कुलकर्णी-पडसलगीकर

Web Title: relatives statement after datta padsalagikar selected as a DGP