शांत साताऱ्याची ओळख पुसतेय?
सातारा - कोडोली व औद्योगिक वसाहत परिसरात घडलेल्या हल्ल्यांच्या घटनांमुळे शहर व उपनगरांतील नागरिकांच्या मनात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. साताऱ्याचा बिहार होतोय काय? असे म्हणण्याइतपत ही परिस्थिती नसली, तरी पोलिसांचा जनमानसावरील दबाव कमी झालाय का? असा विचार करायला लावणारी नक्कीच बनली आहे. पोलिसांनी यासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक बनले आहे.
सातारा - कोडोली व औद्योगिक वसाहत परिसरात घडलेल्या हल्ल्यांच्या घटनांमुळे शहर व उपनगरांतील नागरिकांच्या मनात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. साताऱ्याचा बिहार होतोय काय? असे म्हणण्याइतपत ही परिस्थिती नसली, तरी पोलिसांचा जनमानसावरील दबाव कमी झालाय का? असा विचार करायला लावणारी नक्कीच बनली आहे. पोलिसांनी यासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक बनले आहे.
पेन्शरांचे गाव अशी साताऱ्याची ओळख. त्यामुळे शांतता हा इथला स्थायीभाव समजला जातो. तो कायम असावा, अशी इथल्या प्रत्येकाची मनोमन इच्छा असते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून शहराची ही ओळख पुसतेय, की काय असे म्हणण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील काही वर्षांमध्ये खासगी सावकारी व खंडणीच्या प्रकारांनी साताऱ्याला चांगलेच जखडले. औद्योगिक वसाहतीमधील दादागिरी वाढली. त्यामुळे साताऱ्यात दहशत निर्माण करणारी व त्या माध्यमातून स्वत:चा आर्थिक फायदा करून घेणाऱ्या टोळ्यांची साखळी तयार झाली. ऐन तारुण्यात आलेले अनेक युवक या साखळीच्या नादात अडकले. त्यातून शहर व उपनगरांमध्ये अनेक भाईंचे पीक चांगलेच बोकळायला लागले आहे. लहान- थोर कोणाचीही कशाचीही तमा न बाळगता वेगळ्याच गुर्मीत या टोळ्या फिरत असतात.
त्यातून यातील काही टोळ्यांना राजकीय स्वार्थासाठी जाणीवपूर्वक पोसायची प्रवृत्ती गेल्या काही वर्षांपासून चांगलीच वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक सोडा; परंतु प्रशासकीय अधिकारी किंवा पोलिसांनाही न जुमानण्याची प्रसंगी त्यांच्यावर दादागिरी करण्याची प्रवृत्ती वाढीला लागलेली आहे. असे अनेक प्रसंग साताऱ्यात घडले. त्यामुळे पोलिस व प्रशासकीय अधिकाऱ्यांवरही एक प्रकारचे दडपण निर्माण झाले होते. प्रतापसिंहनगर, औद्योगिक वसाहत, कोडोली, शाहूनगर ते सातारा शहर अशी ही साखळी पसरलेली आहे.
कोडोली येथे किरकोळ वादातून युवकाचा निर्घृणपणे खून झाला. या घटनेने संपूर्ण शहर व परिसर हादरून गेला. साताऱ्यात चाललेय काय असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला. ठिकठिकाणी त्याचीच चर्चा होती. अनेकांनी बिहारचे दाखले द्यायला सुरवात केली. अशा परिस्थितीत काल रात्री औद्योगिक वसाहतीत पुन्हा राडा झाला. त्यामुळे नागरिकांच्या चर्चांना आणखीनच उधाण आले आहे. अगदी बिहारसारखी परिस्थिती साताऱ्यात नाही; पण युवकांमध्ये जी कायद्याची जरब पाहिजे, कोणतेही कृत्य करताना पोलिसांचा धाक वाटला पाहिजे, अशी परिस्थितीत नक्कीच नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनात एक अनाहुत भीती घर करू लागली आहे. ती दूर करण्याची पोलिसांची मुख्य जबाबदारी आहे. त्यासाठी पोलिस अधीक्षकांनी ठोस पावले उचलणे आवश्यक आहे.
संदीप पाटील यांच्या काळात झुंडशाहीला बसला लगाम
पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या काळात शहरातील या झुंडशाहीला लगाम घालण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न झाले. अनेक म्होरक्यांच्या मुस्क्या आवळण्यात आला. त्यातून बोकाळलेली खासगी सावकार व खंडणी वसुलीच्या टोळ्या समोर आल्या. मोका व तडीपारीच्या कारवायांमुळे अनेकांचे धाबे दणाणले. गुन्हा करायला नको, नाहीतर गेलोच अशी भीती या तथाकथित दादांच्या मनात निर्माण झाली होती. त्यामुळे शहर परिसरात शांतता निर्माण झाली होती. मात्र, त्यानंतर पोलिसांचा अंकुश थोडा सैल व्हायला लागल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.