कुकडीचे पाणी सोडा अन्यथा मुख्यमंत्र्यांना अडविणार : आमदार राहूल जगताप

संजय आ. काटे
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

कुकडीचे बंद केलेले आवर्तन तातडीने सोडा अन्यथा उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना श्रीगोंद्यातून अडवू अशी टोकाची भुमिका राष्ट्रवादीचे आमदार राहूल जगताप यांनी घेतल्याने खळबळ उडाली आहे.

श्रीगोंदे (नगर) : कुकडी कालव्यातून सुरु असणारे आवर्तन भाजप व शिवसेना नेत्यांच्या वादातून बंद झाले. श्रीगोंद्यातील शेतकरी पाण्यापासून वंचीत असताना सत्तेत असणाऱ्या नेत्यांचा वाद आता आमच्या शेतकऱ्यांच्या मूळावर आला आहे. बंद केलेले आवर्तन तातडीने सोडा अन्यथा उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना श्रीगोंद्यातून अडवू अशी टोकाची भुमिका राष्ट्रवादीचे आमदार राहूल जगताप यांनी घेतल्याने खळबळ उडाली आहे.

श्रीगोंद्याच्या हद्दीत कुकडीचे पाणी अजून व्यवस्थितीत सुरुही झाले नसतानाच गुरुवारी रात्री ते बंद झाले. सकाळशी बोलताना जगताप म्हणाले, पुणे जिल्ह्यातील शिवसेना आमदार शरद सोनवणे यांनी याप्रश्नी आक्रमक भुमिका घेत कालवा बंद केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, पारनेर येथे कुकडीचे एक कार्यालय सुरु करतानाच पुण्यातील जलसंपदाचे मुख्य कार्यालय नगरला आणण्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील प्रयत्न करीत आहेत. या दोन नेत्यांच्या वादाची किनार आवर्तन बंद करण्याला आहे. मात्र कर्जत व करमाळा तालुक्यातील सिंचन झाले, त्यासाठी तालुक्यातील माजी मंत्र्यासह विखे पाटील व पालकमंत्री राम शिंदे यांनी एकत्रीत प्रयत्न केले. श्रीगोंद्याला एकतर उशिरा पाणी सुरु केले आणि लगेच बंद करण्याची खेळी केली गेली. सत्तेतील दोन नेत्यांचा वाद आमच्या मूळावर येत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही.

उद्या मुख्यमंत्री फडणवीस श्रीगोंद्यातून दौंडला जाणार आहेत. आज तातडीने कालवा सुरु केला नाही तर आपण हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत रस्त्यावर बसून मुख्यमंत्र्यांना अडविणार आहोत. याबाबत नगर व पुणे जिल्ह्यातील जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षकांना माहिती दिली असून, शेतकऱ्यांसाठी कुठलीही किंमत मोजण्यास आम्ही तयार असल्याचे जगताप म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Release the water of kukdi project : MLA Rahul Jagtap