esakal | कामेरी, कासेगावलाही दिलासा: 3 जणांचे अहवाल निगेटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

Relief to Kameri, Kasegaon too : 3 Reports negative

वाळवा तालुक्‍यातील कामेरी व कासेगाव या दोन गावांत आढळलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांशी संबंधित 3 जणांचे अहवाल आज निगेटिव्ह आले आहेत.

कामेरी, कासेगावलाही दिलासा: 3 जणांचे अहवाल निगेटिव्ह

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

इस्लामपूर (जि. सांगली) : वाळवा तालुक्‍यातील कामेरी व कासेगाव या दोन गावांत आढळलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांशी संबंधित 3 जणांचे अहवाल आज निगेटिव्ह आले आहेत. एकूण 27 जणांचे अहवाल प्रलंबित होते, त्यापैकी अद्याप आता 24 जणांचे अहवाल येणे बाकी आहेत. रात्री उशिरा हे तिघांचे अहवाल प्राप्त झाले. शनिवारी कोल्हापूरमध्ये पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णाच्या सान्निध्यात आलेल्या इस्लामपूर येथील एकाच्या अहवालाची धास्ती आहे. ही व्यक्ती इराणहून राजस्थानमध्ये व तेथून क्वारंटाईन होऊन इकडे परतली आहे. 

इस्लामपूर येथील समाजकल्याण विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात एकूण 27 जणांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यामध्ये कामेरी येथील 15, इस्लामपूर, बावची व येडेनिपाणी येथील प्रत्येकी 1, तर कासेगावच्या 9 जणांचा समावेश आहे. यापैकी फक्त तिघांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केलेल्यांवर प्रशासन बारीक लक्ष ठेवून आहे. या 27 जणांच्या अहवालाविषयी तालुक्‍यात मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, रात्री उशिरापर्यंत हे अहवाल प्राप्त झालेच नाहीत. संबंधित ठिकाणी मात्र प्रशासनाकडून योग्य त्या दक्षता घेतल्या जात आहेत. 

शनिवारी (ता. 25) कोल्हापूर येथे पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये इराणहून आलेल्या एका नागरिकाचा समावेश होता. या रुग्णासोबत एकूण 5 जण या भागात आले. त्यापैकी एक जण इस्लामपूर शहरातील आहे. इस्लामपूर प्रशासनाने त्या व्यक्तीला इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केले आहे. त्याचे स्वॅब तपासणीसाठी घेतले असून, त्याचा तपासणी अहवाल आज प्राप्त होणे अपेक्षित होते. मात्र, तो मिळाला नाही. इराणहून आलेली ही व्यक्ती राजस्थानमधील जैसलमेर येथे काही दिवस क्वारंटाईन करण्यात आली होती; मात्र त्यांच्याचसोबत कोल्हापूर शहरात आलेल्या व्यक्तीचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाला ही कारवाई करणे भाग पडले आहे. 

आणखी तिघे होम क्वारंटाईन! 
निगडी (ता. शिराळा) येथील युवती आणि तिची आई कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांना इस्लामपूर येथील ज्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते, तेथे आलेल्या अन्य रुग्णांची व संबंधित व्यक्तींची कसून चौकशी सुरू आहे. रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. दोन दिवसांत यापैकी तीन लोक आढळले असून, त्यांना होम क्वारंटाईन केले आहे. अन्य लोकांचा शोध सुरू असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साकेत पाटील यांनी सांगितले.