पंचपक्वानांच्या महाप्रसादाला दिला फाटा 

पंचपक्वानांच्या महाप्रसादाला दिला फाटा 

कोल्हापूर - धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल कोल्हापुरात आजही आहे. धार्मिक कार्यक्रम म्हटला की त्यासोबत महाप्रसाद ठरलेला आहे. किंबहुना खीर, भात, आमटी एवढ्यावरही समाधान मानता येणारा महाप्रसाद पंचपक्वानांनी सजू लागला आहे. कोल्हापूर म्हटलं की ईर्षा आलीच. त्यामुळे त्या पेठेत महाप्रसादाला गुलाबजामून, तर आपल्या पेठेत बासुंदी अशी चढाओढही सुरू आहे. महाप्रसादाला देणग्या देऊन बेरकी मंडळी दानशूर म्हणूनही ओळखली जाऊ लागली आहेत. अशा वातावरणात महाप्रसादाचा झगमगीतपणा वाढला नसला तर ते आश्‍चर्य नसणार आहे. परंतु, अशा आपल्या कोल्हापुरातच काही अपवादही घडत आहेत. हे अपवादच महाप्रसादाला वेगळी दिशा देणारे आहेत. कारण शुक्रवार पेठेतील शिवनेरी तरुण मंडळ व शिव गणेश मंडळाने महाप्रसादाच्या खर्चातून 60 ते 70 हजार रुपये बाजूला काढून एका धनगरवाड्याचे रूपच पालटून टाकले आहे. 

शुक्रवार पेठेतील जैन मठाजवळ ही दोन्ही मंडळे आहे. कोल्हापुरातील अनेक मंडळांना "गॉडफादर' आहे. त्यांच्या मदतीवर त्या मंडळाची उलाढाल सुरू आहे; पण पहिली वर्गणी आपल्या कार्यकर्त्यांच्या खिशातून हे या मंडळाचे तत्त्व आहे. श्रमदान हे ध्येय आहे. गणपतीचे मंदिर बांधायचे ठरल्यावर पाया खोदाईपासून ते स्लॅब टाकेपर्यंत कार्यकर्त्यांनी घाम गाळला आहे. प्रत्येक वर्षी गणेश जयंतीच्या कार्यक्रमात मोठ्या लोकांच्या सत्काराऐवजी भागातील कष्ट करून जगणाऱ्या ज्येष्ठांच्या मानसन्मानाला प्राधान्य ठरलेले आहे. या मंडळातही कोल्हापूरच्या परंपरेप्रमाणे महाप्रसाद आहे; पण या महाप्रसादात पंचपक्वान्नाऐवजी सामाजिक बांधीलकीचा विचार आहे. म्हणूनच यावर्षी 70 हजार रुपये बाजूला काढले गेले. त्यातून शाहूवाडीतील मालाई धनगरवाड्यातील कुटुंबांसाठी स्टिल ताटे, घागरी, तांबे, सामूहिक करमणुकीसाठी डिश टी.व्ही., टेबल-खुर्च्या, लहान मुलांना ज्ञानरचनेवर आधारित खेळणी, मोठ्या मुलांना खेळण्यासाठी साहित्य, टीशर्ट खरेदी केले गेले. 

हे साहित्य वाटण्यासाठी कोणत्याही नेत्याला निमंत्रित केले नाही. मंडळाच्या परिसरातील महिला व काही कार्यकर्ते मालाईला गेले. तेथे त्यांनी धनगरवाड्यातील सर्व रहिवाशांसमवेत भोजन घेतले. त्यानंतर एका पटांगणात झालेल्या कार्यक्रमात सर्वांना साहित्याचे वाटप केले. 

हे करताना धनगरवाड्यातील लोक गरीब आहेत म्हणून आम्ही त्यांना हे साहित्य देत आहोत, अशा आशयाचा एकही शब्द कोणी आपल्या तोंडातून काढणार नाही, याची दक्षता घेतली गेली. आपण कोणावर तरी उपकार करतो ही भावनाच बाजूला ठेवली गेली. याबरोबरच एक वर्षे हे केले म्हणजे झाले असे न मानता पुढच्या वर्षीही वेगळ्या स्वरूपाचा हातभार लावण्याचा निर्धार करीत हे कार्यकर्ते परतले. 

अन्य मंडळांना आदर्श 
हल्ली कामापेक्षा प्रसिद्धी मोठी असे समीकरण काहींनी लोकप्रिय केले आहे. त्यामुळे कामापेक्षा फोटो व नावाकडे त्यांचे लक्ष आहे. परंतु, कोणाचेही नाव नको ही या मंडळांच्या कार्यकर्त्यांची भूमिका आहे. केवळ प्रसिद्धीसाठी कार्यक्रम करणाऱ्या मंडळांना हा एक धडाच आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com