इस्लामपूरात शंभर रुपयांना व्यायामशाळा भाड्याने ?

Rent a gym in Islampur for a hundred rupees?
Rent a gym in Islampur for a hundred rupees?

इस्लामपूर : शहरातील दोन वेगवेगळ्या व्यायामशाळा अवघ्या शंभर रुपये दरमहा भाड्याने देण्याच्या मुद्द्यावर आणि नगरसेवक वैभव पवार यांनी केलेल्या तक्रारींवर आजची सभा गाजली. कायद्याचे उल्लंघन करून झालेले करार व त्याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईची मागणी झाली. नगराध्यक्षांनी संबंधितांना खडे बोल सुनावत कारवाईच्या सूचना केल्या. 

नगराध्यक्ष निशिकांत पाटील, मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्या उपस्थितीत सभा झाली. अंबिका उद्यान येथील व्यायामशाळा हस्तांतरण विषयावर खल झाला. 2015 ला ठराव करून 2016 मध्ये अवघ्या एक रुपयात व्यायामशाळा बांधून देण्याचा करार झाला आहे. त्यासाठी 9 लाख 51 हजार 725 इतका खर्च केला आहे. वैभव पवार यांनी कायद्याने अशी जागा देता येते का? पदाधिकारी कोण आहेत? नात्यातील लोकांना असा लाभ देता येतो का? असे सवाल उपस्थित केले. नगराध्यक्षांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत कानउघाडणी केली. या आर्थिक नुकसानीला जबाबदार कोण? पालिकेत पदाधिकारी असताना असा लाभ घेणे गैर आहे. 

आर्थिक हानीला जबाबदार धरून गुन्हा दाखल होऊ शकतो. पवार यांनी प्रशासनाला वारंवार पत्रे देऊनही वेळेत दखल घेतली नसल्याची टीका केली. निविदा, जाहिरात न देता हा व्यवहार केला. कर भरणाऱ्या सामान्य नागरिकांना एक रुपयात गाळे का देऊ नयेत? असेही ते म्हणाले. चर्चेत "नातेवाईक' असल्याने या विषयावर शहाजी पाटील यांना मत मांडण्यास मज्जाव केला. पवार यांनी हरकत मांडत करारपत्र रद्द करून ती जागा ताब्यात घ्यावी व जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. नगराध्यक्षांनी हरकत स्वीकारून पुढील कारवाईच्या सूचना प्रशासनाला दिल्या. 

याप्रकरणी कायदेशीर वैधता तपासण्यासाठी नगरविकास प्रधानसचिव यांच्याकडे तक्रार पाठवण्याचे ठरले. व्यक्तिद्वेषापोटी हा विषय घेतला जात असल्याचा आरोप खंडेराव जाधवनी केला. मूळ प्रस्ताव मताला टाकण्याची डांगे, जाधव यांची मागणी फेटाळली. पवार यांनी दिलेल्या पत्रानुसार राजारामबापू पाटील शॉपिंग सेंटरमध्ये किराणा दुकान कामासाठी घेतलेल्या गाळ्यात पतसंस्था कामकाज सुरू असल्याचे उघडकीस आले. जो अधिकारी यात सामील असेल त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश नगराध्यक्षांनी दिले. कारारपत्रातील काही कागद गायब असल्याचे पुढे आले. करार वेगळा आणि वापर वेगळा असून कायद्याचे उल्लंघन झाले आहे त्यामुळे कारवाईची चर्चा असताना पत्रिकेतील विषयानुसार फक्त स्वच्छतागृह वापराचा मुद्दा घेण्याचे ठरले. 

निनाईनगर व्यायामशाळा हस्तांतरण मुद्द्यावर वैभव पवार यांनी पालिकेने नाममात्र शंभर भाडे आकारण्याला आक्षेप घेतला. दोन कोटी रुपयांत मोठे काम उभे राहिले असते, पालिकेचे पैसे वाया गेल्याचे ते म्हणाले. कायदेशीर सल्ला प्राप्त होईपर्यंत हा विषय तहकूब करण्यात आला. वाघवाडी चौक क्रशर चौक ते वाळवा फाटा असा विकास योजना रस्ता पेठ-सांगली रस्त्यास पर्यायी म्हणून उपलब्ध करण्याचा विषय तहकूब झाला. 

गुंठेवारी नियमितीकरण मुद्द्यावर विक्रम पाटील भडकले, जुन्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरत आरोप केले. शासनाचा नवीन सुधारित नियम येणार असल्याने हा विषय रद्द करण्यात आला. सुनीता सपकाळ, आनंदराव मलगुंडे, सुप्रिया पाटील, संग्राम पाटील यांनी चर्चेत भाग घेतला. मुलांचे खेळाचे मैदान आरक्षण रद्द करण्याचा विषय चर्चेअंती मताला टाकण्यात आला. यात दोन्ही बाजूंनी समान 12 मते पडल्यानंतर नगराध्यक्षांनी हक्काचे मत वापरत कलम 37 खाली मूळ प्रस्ताव शिफारशीसाठी पाठवण्याचा निर्णय जाहीर केला. नंतरच्या चर्चेत मात्र आरक्षण रद्द करण्याबाबतचे विषय क्रमांक 47 ते 52 तहकूब करण्यात आले. 

करांबाबत नागरिकांना दिलासा! 
शासनाकडे कोरोना प्रादुर्भावामुळे घरपट्टी बिलातील शास्ती रद्द करणे व 2 टक्के दंडात्मक कर माफ करण्याच्या मागणीचा ठराव झाला. मालमत्ता करात लागू केलेल्या उपयोगिता करही रद्द करण्याचे ठरले. 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com