एका शिक्षकाच्या "लाखमोलाच्या' बदलीची चर्चा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

कोल्हापूर - जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एका शिक्षकाची वर्षभरात तीनवेळा बदली केल्याचा प्रकार घडला आहे. यात प्राथमिक शिक्षण विभागाबरोबर सामान्य प्रशासन विभागानेही अधिक रस दाखविल्यामुळे या "लाखमोलाच्या' बदलीची सध्या जिल्हा परिषदेत चर्चा सुरू आहे. 

कोल्हापूर - जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एका शिक्षकाची वर्षभरात तीनवेळा बदली केल्याचा प्रकार घडला आहे. यात प्राथमिक शिक्षण विभागाबरोबर सामान्य प्रशासन विभागानेही अधिक रस दाखविल्यामुळे या "लाखमोलाच्या' बदलीची सध्या जिल्हा परिषदेत चर्चा सुरू आहे. 

जिल्हा परिषदेत बदली हा तसा नेहमी चर्चेचा आणि सतत गाजत असणारा विषय असतो. सामान्य कर्मचाऱ्यांसाठी किंवा शिक्षकांसाठी बदलीसाठी नियमावर बोट ठेवत मार्चशिवाय बदल्या होत नाहीत. तुम्हाला कळते की नाही. कशाला वशिला लावता? असे ऐकून घ्यावे लागते, मात्र काही खास माणसांसाठी हे नियम सोयीस्करपणे बासनात गुंडाळून ठेवले जातात. यापूर्वी शिरोळहून भुदरगडला एका महिला शिक्षिकेची बदली झाली होती. 

त्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर कार्यवाही करण्याऐवजी अधिकाऱ्यांनी हे प्रकरण मिटविण्याच्या नावाखाली मलिदा खाल्ल्याची चर्चा संबंधित विभागात आहे. सध्या "वैजनाथा'ला कौल लावून बसलेल्या एका शिक्षकाची बदलीही अशीच गाजत आहे. 

गजापूर येथून या शिक्षकाची बदली 21 मार्चला पाचगावला झाली. "अर्थपूर्ण' व्यवहारातून ही बदली झाल्याचे या प्रकरणात जोडलेल्या कागदपत्रावरून दिसून येते. या बदलीत काहीतरी काळेबेरे असल्याची जाणीव तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांना आल्याने त्यांनी तत्काळ ही बदली रद्द केली. 11 मे रोजी पाचगावहून परत त्या शिक्षकाला गजापूरला पाठविले. त्यामुळे बदली झालेल्या शिक्षकापेक्षा सामान्य प्रशासन विभागातील अधिकारीच अस्वस्थ झाले. संबंधित शिक्षकाने पुन्हा त्यांच्या मागे बदलीसाठी तगादा लावला. त्यामुळे अधिकारी संधीची वाट पाहू लागले. श्री. सुभेदार यांची बदली झाल्यानंतर पुन्हा ही फाईल नव्याने तयार केली. 

दरम्यानच्या काळात या "नाथा' सामान्य प्रशासन विभागातील एका अधिकाऱ्याने अन्याय झाला असल्याचे सांगून न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे त्या शिक्षकाने प्रशासनाविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली. डॉ. कुणाल खेमणार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे घेतल्यानंतर प्राथमिक शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांपेक्षा सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या "नाथा'च्या बदलीसाठी हालचाली सुरू केल्या. 

संबंधिताकडून खबरदारी 
विशेष शिक्षक स्वीकारले असतानाही पुन्हा त्याच ठिकाणी शिक्षकपदी नियुक्‍ती करण्याची मागणी 35 शिक्षकांची आहे. त्यांना डावलून या "लाडक्‍या' शिक्षकाची बदली झाली आहे. त्याने 28 सप्टेंबरला दावा दाखल केला होता. बदलीचा प्रस्ताव झाल्यानंतर डॉ. खेमणार यांना संबंधित अधिकाऱ्यांनी या शिक्षकाने जिल्हा परिषदेवर दावा दाखल केला आहे. जर त्याची बदली केली तर तो दावा मागे घेण्यास तयार असल्याचे सांगितले. डॉ. खेमणार नवीन असल्यामुळे त्यांनी अधिकाऱ्यांवर विश्‍वास ठेवून 1 डिसेंबरला चंदूर (ता. हातकणंले) येथील शाळेत त्याच्या बदलीचा आदेश काढला. यातील "लाखमोला'ची चर्चा त्यांच्या कानावर जाणार नाही, याची मात्र खबरदारी संबंधितांनी घेतली.

Web Title: Replacement of a teacher discussion