esakal | दिलासा : कर्नाळच्या त्या कुटुंबातील आठ जणांचे अहवाल निगेटिव्ह 
sakal

बोलून बातमी शोधा

The report of eight members of that family from Karnal is negative

मिरज तालुक्‍यातील कर्नाळ येथील 35 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने सांगलीकर हादरले होते. दरम्यान, कर्नाळसह कुपवाड येथील "कोरोना'बाधितच्या कुटुंबाच्या संपर्कातील अशा 37 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 

दिलासा : कर्नाळच्या त्या कुटुंबातील आठ जणांचे अहवाल निगेटिव्ह 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली : मिरज तालुक्‍यातील कर्नाळ येथील 35 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने सांगलीकर हादरले होते. त्या रुग्णाच्या कुटुंबातील आठ सदस्यांचे "स्वॅब'चे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्या सर्वांचा अहवाल आज सायंकळी निगेटिव्ह आला. दरम्यान, कर्नाळसह कुपवाड येथील "कोरोना'बाधितच्या कुटुंबाच्या संपर्कातील अशा 37 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आजीचे निधन झाल्याने कर्नाळ येथील तरुण सातारा येथे गेला होता. त्याठिकाणी त्याचा मावसभाऊ मुंबईहून आला होता. या कुटुंबातील एकाला कोरोना झाल्याचे निदान झाल्यानंतर सातारा येथील यंत्रणेने जिल्हा प्रशासनाला माहिती दिली. त्यानुसार तपासणीसाठी कर्नाळच्या तरुणाला दाखल करीत त्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्याला कोरोना झाल्याचे काल स्पष्ट झाले.

त्यानंतर आरोग्य यंत्रणेने तातडीने त्याच्या कुटुंबातील सदस्यांना विलगीकरण कक्षात दाखल करून तपासणीसाठी "स्वॅब'चे नमुने घेतले होते. त्यात पत्नी, वडील, दोन मुले, भाऊ व अन्य असे आठ जणांचा समावेश होता. आज सायंकळी तो अहवाल आल्याने सांगलीकरांना दिलासा मिळाला. कुपवाड येथील 17 वर्षीय तरुणीला कोरोनाबाधा झाल्यानंतर तिच्या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या 29 जणांचा अहवाल आज निगेटिव्ह आला. 

दरम्यान, सध्या मिरज येथे सात कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली. 

कोटा येथून आलेले 14 विद्यार्थीही निगेटिव्ह

कोटा (राजस्थान) येथे शिक्षणासाठी गेलेले जिल्ह्यातील 14 विद्यार्थी जिल्ह्यात परतले होते. या सर्वांचेही नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्याचाही अहवाल आला आहे. सर्वजण निगेटिव्ह आहेत.