सैनिकांचे चिंचनेर खंतावतंय शेतीच्या प्रश्‍नांनी

चिंचनेर वंदन येथील आजी-माजी सैनिक. मागे स्वागत करणारी कमान.
चिंचनेर वंदन येथील आजी-माजी सैनिक. मागे स्वागत करणारी कमान.

‘आमची चौथी पिढी सैन्यात आहे. घरटी किमान दोन युवक सीमेवर आहेत. गावात सुमारे साडेतीनशे माजी सैनिक आहेत’, असं २८ वर्षीय पुरुषोत्तम बर्गे हा कारगिलमध्ये तैनात; पण सुट्टीवर आलेला जवान सांगत होता. सातारहून रहिमतपूरकडे जाताना चिंचनेर वंदन आहे. त्याच्या स्वागत कमानीवरच ठळक लिहिलंय, ‘माजी सैनिक संघटना आपलं सहर्ष स्वागत करत आहे. जय जवान-जय किसान’. 

कुतूहल वाटलं म्हणून थांबलो. सकाळची वेळ. चौकातल्या गणेश दूध संकलन केंद्रावर उत्पादकांची लगबग. दहा-बारा युवकांची चर्चा रंगलेली. झाडाखाली ज्येष्ठांचं गप्पाष्टकं सुरू. दूध केंद्रात गेलो. एकानं विचारलं कुठून आलात. ओळख झाली. त्यानं सैन्यात असल्याचं सांगितलं. गावात किती युवक सैन्यात, विचारताच दोघं-तिघं एकदम कौतुकानं म्हणाले, ‘किमान तीनशे युवक तरी सैन्यात. घरटी दोन आहेतच’. हे ऐकून थबकलोच. सध्या देशाची निवडणूक बालाकोट, सर्जिकल स्ट्राइक, एअर स्ट्राइकभोवती फिरतेय. असं म्हणताच जवान बर्गे म्हणाले, ‘आम्हाला याचं अप्रुप नाही.

सगळ्यांनीच असे प्रसंग अनुभवलेत. अनेकजण दररोज छातीचा कोट करून सीमेवर तैनात आहेत. कित्येक माजी सैनिकांनी चीन, पाकिस्तानच्या लढाईत पराक्रम गाजवलाय.’

हा भाग सधन शेतीचा. दोन कालव्यांनी पंचक्रोशी बागायती केलीए. तरीही प्रश्न पडला इतके युवक सैन्यात का? कट्ट्यावरच्या आजोबांना रामराम केला. निवृत्ती कदम त्यांचं नावं. २२ वर्षांच्या सेवेनंतर १९८५ मध्ये सैन्यातून निवृत्त झालेले. बांगलादेश निर्मितीच्या लढाईत सहभाग होता त्यांचा. त्यांना थेटचं विचारलं, ‘सध्या सैनिकांच्या नावानं राजकारण होतंय असं वाटतं का?’ अगदी पापभिरूपणे हसत म्हणाले, ‘सगळं पाहून हसावं की रडावं कळत नाही. आता नव्वदीला टेकायलोय. असं नव्हतं कधी’.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com