बेरोजगारांचे थवे

संजय मिस्कीन
शनिवार, 20 एप्रिल 2019

‘तीन वर्षांपासून पॉवरलूम बंद पडल्यात. नोटाबंदी व जीएसटीने कापड धंद्याची वाट लागलीय. तरुणांची लग्नं होत नाहीत. यंत्रमागावरचा पाळी कामगार हा एकेकाळी कायम रोजगार होता. आता तो बेभरवशाचा व्यवसाय झालाय...’’ इचलकरंजीतल्या जमदाडे मळ्यातील यंत्रमागात कार्यरत ६७ वर्षीय लतिफ मैंदर्गी सांगत होते.

‘तीन वर्षांपासून पॉवरलूम बंद पडल्यात. नोटाबंदी व जीएसटीने कापड धंद्याची वाट लागलीय. तरुणांची लग्नं होत नाहीत. यंत्रमागावरचा पाळी कामगार हा एकेकाळी कायम रोजगार होता. आता तो बेभरवशाचा व्यवसाय झालाय...’’ इचलकरंजीतल्या जमदाडे मळ्यातील यंत्रमागात कार्यरत ६७ वर्षीय लतिफ मैंदर्गी सांगत होते.

मागील पाच वर्षांत सरकारच्या धोरणाने महाराष्ट्राचे मॅंचेस्टर असलेल्या इचलकरंजीतल्या या व्यवसायाची अवस्था जाणून घेण्यासाठी गेलो. शेतकरी नेत्याच्या आंदोलनाभोवती राजकारण फिरणाऱ्या या हातकणंगले मतदारसंघात कामगारांच्या समस्या ऐकण्यासाठी गेलो. कोल्हापूरहून इचलकरंजीला जाताना शेतकऱ्यांशी बोललो. समिश्र प्रतिक्रिया होत्या. काहींचा खासदार राजू शेट्टी यांच्याबद्दल आदर होता. पण, या वेळी मित्रपक्ष सोडल्याचाही खेद होता.

यंत्रमागात गेल्यावर कामगार सांगत होते की, या धंद्यात कामगार असेल, तर मुलगी दिली जायची. आता मुलगी देत नाहीत. खात्रीच नाही धंद्याची. अनेक मालक लूम भंगारात घालायला लागलेत. या शहरात बेरोजगरांचे थवे वाढलेत. तरुण पिढी धंद्यात नाही. पन्नास टक्के यूपी, बिहारी कामगार आहेत. कामगार मिळत नाही म्हणून या वयातही स्वत:ला काम करावे लागतेय, असे लतिफ मैंदर्गी सांगत होते. समोरच एका कामगाराला ओळख विचारली. तो उत्तर प्रदेशातून होता.

रोहितकुमार (वय २५) यूपीच्या बनारस मधून. या यंत्रमागात काम करणारे ३०-४० जण एकाच गावचे. कमी पगारावर असलो, तरी रोजगार मिळतोय म्हणून तो इथे आलोय. या कारखान्यातून बाहेर पडलो. बाजूलाच ज्यूस सेंटर चालविणाऱ्या राकेश हवळ या २६ वर्षीय युवकाशी संवाद साधला. तो सांगत होता, तीन वर्षांपूर्वी यंत्रमागात काम करीत होतो. नोटाबंदीनंतर सगळे ठप्प झाले, नोकरी गेली. आता फळरसाचे दुकान चालवतोय. मतदारसंघ शेतकरी नेत्याशी संबंधित असल्याने इचलकरंजी ते खिद्रापूर दरम्यान ऊस उत्पादकांना भेटलो. बहुतांश ऊस उत्पादक शेतकरी दरवर्षी भाववाढ मिळते; त्यासाठी आंदोलन करावे लागत असले, तरी समाधान असल्याची भावना व्यक्त करीत होते.

कृष्णा नदीकाठावर ऊसशेतीला बगल देऊन ढोबळी मिरचीचे पीक घेतलेल्या खिद्रापूरच्या प्रकाश खुरपे व भरतेश खुरपे यांच्या शेतात थांबलो. चार एकरातली ढोबळी मिरची हैदराबादला पाठविण्याची घाई सुरू होती. शेती कधीच कायम नफ्यात नसते, चढउतार असतातच. पण, या सरकारच्या काळात शेतीमाल भावाचा उतार कायम असल्याचे प्रकाश खुरपे म्हणाले. 

इचलकरंजीत आलेला बनारसच्या गंगेकाठचा बेरोजगार असो अथवा कृष्णेच्या काठावर शेती करणारा शेतकरी असो... दोघांचे धर्म एक असतील अथवा नसतील; पण पोटातली भूख मात्र सारखीच..! हातकणंगले मतदारसंघातल्या राजकारणाचा शेती हा केंद्रबिंदू असला, तरी इथे कामगार व बेरोजगारी या समस्यादेखील निवडणुकीच्या प्रचारातला सौम्य फॅक्‍टर बनल्या आहेत.

Web Title: Reporter Diary Sanjay Miskin Unemployed Currency Ban Worker