रिपब्लिकन सेनेच्या सचिवाचा महापालिकेत आत्मदहनाचा प्रयत्न 

रिपब्लिकन सेनेच्या सचिवाचा महापालिकेत आत्मदहनाचा प्रयत्न 

सोलापूर : महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकारी सुधा साळुंखे यांच्या चौकशीचा अहवाल शासनाकडे पाठविण्यास विलंब होत असल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेनेचे जिल्हा सचिव विनायक गायकवाड यांनी महापालिका आयुक्त कार्यालयासमोरच आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला. 

सोलापूर महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकारी सुधा साळुंखे यांच्या कारभारासंदर्भात चौकशी अहवाल महापालिकेचे उपायुक्त त्रिंबक डेंगळे पाटील यांच्या कार्यालयात पाठविला आहे. पुढील कारवाईसाठी हा अहवाल राज्य शासनाच्या शिक्षण आयुक्तांकडे पाठविण्यास महापालिका अधिकाऱ्यांकडून दिरंगाई व टाळाटाळ होत असल्याचा आरोप करीत तातडीने हा चौकशी अहवाल शासनाकडे पाठवावा या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेचे जिल्हा सचिव विनायक अशोक गायकवाड (रा. शहा नगर हाउसिंग सोसायटी, वांगी रोड, सोलापूर) यांनी दि. 8 ऑक्टोबर 2018 रोजी लेखी पत्राद्वारे महापालिका आयुक्तांना आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानुसार विनायक गायकवाड यांनी शनिवारी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

इशारा दिल्यामुळे महापालिका आयुक्त कार्यालयासमोर पोलिस बंदोबस्तही तत्पूर्वी तैनात होता. पालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या समोरून विनायक गायकवाड काळा बुरखा परिधान करून रॉकेलची बाटली घेऊन महापालिका आयुक्त कार्यालयाच्या दिशेने पळत आले. येत असतानाच त्याने पिशवीतून आणलेल्या बाटलीतील रॉकेलही प्राशन केले. पोलिसांना चकवा देऊन बुरखा परिधान करून त्यांनी थेट आयुक्त कार्यालयासमोरच येऊन अंगावर रॉकेल ओतून घेतले. त्याच वेळी प्रसंगावधान राखून आयुक्त कार्यालय परिसरातील पोलिसांनी गायकवाड यास ताब्यात घेतले. यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. गायकवाड यांच्या अंगावरील रॉकेलने भिजलेला बुरखा काढून त्यांच्या हातातील बाटली पोलिसांनी जप्त केली. त्यानंतर पोलीस वाहनातून गायकवाड यास सोलापूर शासकीय रुग्णालयाकडे पाठविण्यात आले.

दरम्यान, प्रशासनाधिकारी सुधा साळुंखे यांच्याशी संपर्क साधला असता चौकशी सुरु आहे. खरे काय ते निष्पण्ण होइल, असे त्यांनी सांगितले.

कारभाराची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांनी त्याचा अहवाल महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. मात्र तो अहवाल पुढील कारवाईसाठी शिक्षण आयुक्तांकडे पाठवण्याऐवजी महापालिकेतच ठेवण्यात आला आहे. कारवाईस विलंब होत असल्याच्या निषेधार्थ अखेर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे असे सांगतानाच महापालिकेचे उपायुक्त त्रिंबक डेंगळे पाटील, महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे व अतिरिक्त आयुक्त श्रीकांत मायकलवर यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्ते विनायक गायकवाड यांनी यावेळी केली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com