70 फुट खोल विहीरीत पडलेल्या बिबट्याची सुटका

आनंद गायकवाड
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

आश्वी(अहमदनगर) : संगमनेर तालुक्यातील सावरगावतळ येथील मांडवदरा परिसरातील गट नंबर 37 मधील कुंडलीक दादाभाऊ दुधवडे यांच्या सामुहिक मालकीच्या सुमारे 70 फुट खोल विहीरीत पडलेल्या बिबट्याची वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने सुखरुप सुटका केली. 

आश्वी(अहमदनगर) : संगमनेर तालुक्यातील सावरगावतळ येथील मांडवदरा परिसरातील गट नंबर 37 मधील कुंडलीक दादाभाऊ दुधवडे यांच्या सामुहिक मालकीच्या सुमारे 70 फुट खोल विहीरीत पडलेल्या बिबट्याची वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने सुखरुप सुटका केली. 

गुरुवार ( ता. 23 ) च्या रात्री बारा ते एकच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या बिनकठड्याच्या विहीरीत पडला. आज सकाळी विहीरीवरील विजपंप सुरु करण्यासाठी गेलेल्या कुंडलीक दुधवडे यांना विहीरीतून बिबट्याच्या डरकाळीचा आवाज आल्याने, त्यांनी डोकावले असता, त्यांना बिबट दिसला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस पाटील गोरक्ष नेहे यांनी वनविभागास माहिती दिली.

दरम्यानच्या काळात बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. संगमनेर भाग 1 चे वनक्षेत्रपाल निलेश आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल आर. बी. माने, वनरक्षक सुभाष अडांगळे यांनी त्यांच्या रेस्क्यू पथकासह घटनास्थळ गाठले. विहीरीतील पाणी उपसल्यानंतर आत सोडलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकल्यानंतर त्याला बाहेर काढण्यात आले. हा सुमारे पाच वर्ष वयाचा नर जातीचा बिबट्या आहे. या परिसरात नर व मादी बिबट्याच्या जोडीला अनेक ग्रामस्थांनी पाहिल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे. पोलिस पाटील गोरक्ष नेहे, उपसरपंच शिवनाथ नेहे, तंटामुक्ती अध्यक्ष परशराम नेहे, संयुक्त वनकमिटी अध्यक्ष दशरथ गाडे यांच्यासह ग्रामस्थांनी वनविभागाला या कामी सहकार्य केले. या बिबट्याला प्रथम निंबाळे येथील वनरोप वाटिकेत हलवले असून, नंतर माणिक डोह येथील वनविभागाच्या बिबट्या निवारण केंद्रात पाठविण्यात येणार आहे.

Web Title: The rescue of a leopard in the 70-foot-deep well