जुळ्यांच्या हस्तरेषातील तफावत ओळखण्याचे संशोधन 

जुळ्यांच्या हस्तरेषातील तफावत ओळखण्याचे संशोधन 

कोल्हापर - हुबेहूब दिसणाऱ्या जुळ्यांच्या हाताच्या ठशातून दोन जुळ्यांतील तफावत जाणून घेण्याच्या संशोधनाला राष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. अशा पद्धतीने तफावत शोधण्याचे संशोधन प्रथमच झाले आहे. येथील पत्की हॉस्पिटल व डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाने जुळ्यांतील तफावत शोधण्यासाठी असे संशोधन केले असून त्यासाठी हाताच्या ठशांवरून जुळ्यातील तफावत शोधता येते, ही बाब पुढे आली आहे. यातून वैद्यकीय संशोधनात कोल्हापूरचा लौकिक अधोरेखीत झाला आहे. त्याची दखल म्हणून हे संशोधन नॅशनल जर्नल ऑफ क्‍लिनिकल ऍनोटॉमी या विख्यात नियतकालिकात पुढील महिन्यात प्रसिद्ध होणार असल्याची माहिती प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सतीश पत्की, डॉ. अनिता गुणे व डॉ. आनंद पोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

डिजिटल इंडियाच्या जमान्यात आधार कार्डपासून बायोमेट्रिकपर्यंत हाताच्या ठशाचे (फिंगरप्रिंट) महत्त्व वाढले आहे. बायमेट्रिकचा वापर करताना फिंगरप्रिंटमध्ये साम्य असल्यास त्यातून कांही तांत्रिक धोके संभवतात. त्यामुळे जुळ्यांची तफावत पडताळण्यासाठी हे संशोधन उपयोगी ठरणार आहे. जुळे किंवा तिळे जन्मल्यास त्यांच्या दिसण्यापासून ते शारीरिक रचनेपर्यंत बहुतेक सर्वच गोष्टीत साम्य असते. दोघांतील फरक समजून घेताना अनेकदा गोंधळ उडू शकतो. त्यामुळे जुळ्यामधील दोघांची स्वतंत्र ओळख शास्त्रीय पद्धतीने समजून घेण्यासाठी हे संशोधन करण्यात आले. 

गेल्या 25 वर्षांत पत्की हॉस्पिटलमध्ये 25 हजार प्रसूती झाल्या. यात 418 जुळे व 6 तिळ्यांचा जन्म झाला. अशा सर्व जुळ्यांचा स्नेहमेळावा 2013 मध्ये पत्की हॉस्पिटलतर्फे शाहू स्मारक भवनात झाला. त्याची नोंद लिम्का बुक ऑफ वल्ड रेकॉर्डमध्ये झाली. या स्नेहमेळाव्यात सर्व जुळ्यांची व तिळ्यांची वैद्यकीय माहिती व छायाचित्रे घेण्यात आली. 

यातील पत्की हॉस्पिटलमध्ये जन्मलेल्या विविध वयोगटांतील 28 जुळ्यांच्या बोटांचे ठसे घेण्यात आले. या ठशांचा अभ्यास दुर्बिनीद्वारे तसेच शरीरशास्त्रतज्ज्ञांतर्फे करण्यात आला. यात हाताच्या ठशातील चार प्रकारच्या ठेवणीचा अभ्यास झाला. बोटांच्या पेऱ्यावरील वर्तुळाकार रेषेला चक्र म्हणतात. तळव्यांवरील विशिष्ट बिंदू शंखाचा आकार निर्माण करतात. काहीच्या हातात दोन्ही प्रकार एकत्रित दिसतात. त्या रेखांचे मोजमाप करण्यात आले. हातावरील रेषा या गर्भावस्थेच्या 3 ते 5 महिन्याच्या कालावधीत तयार झालेल्या असतात. त्यानंतरच्या आयुष्यात या रेषा कधीही बदलत नाहीत. अशा सर्व बारकाव्यांची यात नोंद घेण्यात आली आहे. 

अनेक ठिकाणी होणार उपयोग 
अनेक जुळ्यामध्ये दिसण्यात साम्य असते. रक्तगटही एकच असतो. जनुकीय संदर्भ एकच असतात. त्यामुळे दोन्ही व्यक्तींमध्ये फरक दिसत नाही. अशा वेळी जुळ्यामधील फरक ठशांद्वारे समजून घेता येणे शक्‍य असल्याची बाब संशोधनात पुढे आली. तसेच जुळ्या व्यक्तींच्या हस्तरेखामधील फरक 6.7 ते 45 टक्के इतकाच असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे जुळ्यांमधील बायोमेट्रिक कार्ड, आधार कार्ड, कॅशलेसपासून ते गुन्ह्यातील ठसे साधर्म्यातील तफावत जाणून घेण्यासाठी या संशोधनाचा वापर होणार असल्याचे डॉ. पत्की व डॉ. गुणे, डॉ. पोटे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com