संशोधन ही देखील देशसेवाच 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जानेवारी 2017

डॉ. दिनकर साळुंखे : आंबेवाडी संमेलनात विज्ञानाच्या महतीवर व्याख्यान 

डॉ. दिनकर साळुंखे : आंबेवाडी संमेलनात विज्ञानाच्या महतीवर व्याख्यान 

बेळगाव : केवळ सैन्यात जाणे ही देशसेवा नाही, तर संशोधन क्षेत्रात जाणे ही देखील देशसेवाच. ती जगसेवाही आहे. पण आजचे विद्यार्थी केवळ आयएएस, आयपीएस होण्याचेच स्वप्न पाहत असतात. जेव्हा "शास्त्रज्ञ होणार' असे म्हणणारे विद्यार्थी या देशात तयार होतील, तो क्षण या देशासाठी भाग्याचा क्षण असेल, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधक डॉ. दिनकर साळुंखे यांनी केले. 
आंबेवाडी येथे चौथ्या मराठी सांस्कृतिक संमेलनात ते बोलत होते. देशाच्या विकासातील विज्ञानाची आवश्‍यकता, या विषयावर त्यांनी विचार मांडले. ते म्हणाले, ""भारताने विज्ञानातून विकासाकडे ही नीती ठरवल्यामुळे स्वावलंबी होणे शक्‍य झाले. या धोरणाला विरोध करून अन्न, वस्त्र, निवारा हेच धोरण पुढे चालू ठेवावे असा आग्रह अनेक राजकारणी करत होते. कमीत कमी खर्चात संपूर्णपणे स्वनिर्मित यान मंगळावर पाठवणारा भारत पहिला देश ठरला. चंद्रावर पाणी असल्याचे संशोधन भारतीय यानाने केले हे अभिमानास्पद आहे. इतकेच नाही, तर ग्रामीण माहिती केंद्रांना सॅटेलाइट पातळीवर आणण्याची क्रांती सर्वसामान्यांना फायद्याची ठरत आहे.'' 
अमेरिकेतून गहू आणि मक्‍याची वाट पाहणारा भारत आता अन्नधान्यात स्वावलंबी झाला आहे. दुधाचा महापूर आणत धवलक्रांती झाली. डेअरी उद्योगाला तंत्रज्ञानानेच नावारूपाला आणले. अशा प्रकारे त्या त्या क्षेत्रातील संशोधन क्रांतीसाठी कारणीभूत झाले आहे. आज मध्यमवर्गीय आपल्या मुलांना इंजिनिअर बनवण्याचे स्वप्न पाहत असतो. याला कारणीभूत आयटी क्षेत्रातील क्रांती आहे. पण ज्याप्रमाणे मोटार घ्यावी तर जपानची, इलेक्‍ट्रिक साहित्य नॉर्वे, डेन्मार्कचे घ्यावे असे मानक ठरले आहेत, त्याप्रमाणे आयटी सर्व्हिससाठी भारतातच जावे, असा मानदंड जगभरात बोलला जात आहे, असे गौरवोद्‌गार काढून डॉ. साळुंखे म्हणाले, ""आता आयटीप्रमाणे जीवशास्त्र प्रगतीही महत्त्वाची ठरत आहे. शेती, आरोग्य आणि पर्यावरण क्षेत्रात जीवशास्त्रामुळे फार मोठी क्रांती होत आहे. जेनेरिक औषधातील सर्वाधिक उत्पादने भारतात होत आहेत.'' 
 

Web Title: research is like a patriotism