नोकरी, शिक्षणासाठी आरक्षण हवेच

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 डिसेंबर 2016

१५ डिसेंबरला हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरला मोठ्या संख्येने कार्यकर्ते जाणार आहेत. मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी तेथे होणाऱ्या मोर्चात कार्यकर्ते सहभागी होतील. वाहनांसह रेल्वे आणि इतर नियोजनही सुरू आहे. आता नागपूरमध्ये ताकद दाखवण्यात येणार असल्याचे वसंत मुळीक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

- वसंत मुळीक

कोल्हापूर - कोपर्डी घटनेतील तीनही आरोपींच्या विरोधातील खटल्याचा निर्णय शीघ्रगतीने व्हावा, मराठा समाजासाठी नोकरी व शिक्षणासाठी आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा वीस मागण्यांचे जम्बो निवेदन आज सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना दिले. मागण्यांबरोबरच त्यावर उपाय काय असावेत, याचीही माहिती निवेदनात दिली आहे. शिष्टमंडळात सकल मराठा समाजातील नेते व कार्यकर्ते यांचा समावेश होता. 

मौजे कोपर्डी (ता. कर्जत, जि. नगर) येथील तीनही आरोपींविरुद्ध सज्जड पुराव्यांसह दोषारोपपत्र दाखल करावे, त्यामध्ये तीनही आरोपींना फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत न्यायालयीन लढाई लढावी ही पहिलीच मागणी निवेदनातून मांडली आहे. त्यापाठोपाठ अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम (कायदा) १९८९, सुधारित कायदा २०१६ व १९९५  च्या तरतुदींचा गैरवापर होत असल्यामुळे त्यामध्ये दुरुस्ती झाली पाहिजे. मराठा समाजासाठी नोकरी व शिक्षणासाठी आरक्षण मिळालेच पाहिजे त्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील याचीही माहिती निवेदनात दिली आहे. समाजातील एका घटकास कुणबी म्हणून राज्यातील काही भागांत आरक्षण मिळते, त्याबाबतही संदर्भ निवेदनात दिले आहेत.

कुणबी-मराठा-कुणबी, कुणबी-मराठा यांना जातीचे प्रमाणपत्र वितरीत करण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचे निर्गमित करावे. मराठा, इतर मागास, खुला प्रवर्गातील सरकारी अधिकारी-कर्मचारी यांच्यावर पदोन्नतीत होणारा अन्याय थांबविण्यात यावा अशा वीस मागण्या आणि त्यासाठी करावी लागणारी उपाययोजना असे २६ पानांचे जंबो निवेदन शिंदे यांना दिले.
सकल मराठा समाजाचे वसंतराव मुळीक, सचिन तोडकर, हिंदूराव हुजरे-पाटील, उमेश पोवार, शिवाजी खोत, शशिकांत पाटील, संजय साळोखे, राजवर्धन यादव, महादेव पाटील, प्रकाश पाटील, अनिल पाटील, उत्तम पोवार, प्रशांत बरगे, निखिल रोकडे, मनोज नरके, विजय पाटील, मारुती जाधव, वैशाली महाडिक, शैलजा भोसले, नेहा मुळीक, महेश पोवार, साक्षी पन्हाळकर, अमर पाटील, संजय जाधव, संजय काटकर, संजय साळोखे, दीपक पाटील, रामचंद्र पवार, हेमंत पाटील, रमेश काखेकर, विकास जाधव, हर्षल सुर्वे, कमलाकर जगदाळे, आदिनाथ शेलार, दीपा पाटील, कविता कोंडेकर, बबलू ठोंबरे, संदीप बोरगावकर, सचिन पाटील, विजय पाटील-सुपात्रेकर याचा शिष्टमंडळात समावेश होता. 

देश-विदेशांतील मोर्चाची माहिती
राज्यात ४६ ठिकाणी मूक मोर्चे निघाले. महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटक, मध्य प्रदेश, देवास-मध्य प्रदेश, बुऱ्हानपूर-मध्य प्रदेश, ग्वाल्हेर-मध्य प्रदेश आदी पाच ठिकाणी मराठा क्रांती मोर्चे झाले. भारत देशाबाहेर मास्को-रशिया, नेदरलॅंड, दुबई आणि न्यूयॉर्क-अमेरिका आदी ठिकाणी मोर्चे निघाले. देश-विदेशांत एकूण ५५ ठिकाणी मोर्चे निघाले. त्याची माहितीही निवेदनाद्वारे दिली आहे. हे निवदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवावे, अशी मागणी शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्याकडे केली.

Web Title: reservation for service, education