तरडगाव, हिंगणगाव गटांत खरी चुरस 

व्यंकटेश देशपांडे - सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

फलटण - फलटण तालुक्‍यातील सातही गट खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने जिल्हा परिषदेच्या राजकारणामध्ये तालुक्‍याला राजकीयदृष्ट्या वेगळे महत्त्व आले आहे. खऱ्या अर्थाने तालुक्‍यातील तरडगाव आणि हिंगणगाव गटांतून निवडून येणाऱ्या सदस्याला अध्यक्षपदाची जास्त संधी मिळण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे या दोन्ही गटांतच खरी चुरस अधिक प्रमाणात राहणार आहे. 

फलटण - फलटण तालुक्‍यातील सातही गट खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने जिल्हा परिषदेच्या राजकारणामध्ये तालुक्‍याला राजकीयदृष्ट्या वेगळे महत्त्व आले आहे. खऱ्या अर्थाने तालुक्‍यातील तरडगाव आणि हिंगणगाव गटांतून निवडून येणाऱ्या सदस्याला अध्यक्षपदाची जास्त संधी मिळण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे या दोन्ही गटांतच खरी चुरस अधिक प्रमाणात राहणार आहे. 

फलटण तालुक्‍यातील तरडगाव, हिंगणगाव व गिरवी हे तीन गट खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित आहेत. कोळकी, विडणी, गुणवरे आणि साखरवाडी हे चार गट खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित आहेत. मागील निवडणुकीत साखरवाडी गट हा खुला राहिला होता. या गटात राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने तुल्यबळ उमेदवार दिले होते. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या वतीने साखरवाडी गटातील निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती. या वेळीही तशाच पध्दतीने तरडगाव आणि हिंगणगाव गटात खऱ्या अर्थाने प्रतिष्ठेच्या लढती होतील, अशी स्थिती आहे. काहीही झाले तरी फलटण तालुक्‍याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष असून अध्यक्षपदाच्या स्पर्धेमध्ये सद्य:स्थितीत तरडगाव व हिंगणगाव गटांची चर्चा आतापासूनच सुरू असल्याचे दिसून येते. 

संजीवराजे की अन्य कोण? 
सध्याच्या स्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून तरडगाव गटातून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, माजी सभापती वसंतराव गायकवाड, सुभाष गायकवाड, प्रशांत गायकवाड यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. कॉंग्रेसच्या गोटातून पांडुरंग शिंदे, वसंतराव ठोंबरे यांची नावे आघाडीवर आहेत. मागील वेळी तरडगाव गट हा खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव राहिल्याने तेथून शिवांजलीराजे नाईक-निंबाळकर निवडून आल्या होत्या. 

हिंगणगाव गटातही चुरस 
हिंगणगाव गटातून कॉंग्रेसतर्फे धनंजय साळुंखे-पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. राष्ट्रवादीतून विलासराव नलवडे व धैर्यशील ऊर्फ दत्ता अनपट यांची नावे पुढे आहेत. या गटातही उमेदवारीसाठी चुरस दिसते. मागील निवडणुकीत या गटातून राष्ट्रवादीकडून निवडून आलेल्या सौ. अनपट यांना विजयासाठी काही प्रमाणात झगडावे लागले होते. त्यामुळे या गटात कॉंग्रेसकडून ताकद लावली जाण्याची शक्‍यता दिसते. 

फलटण तालुक्‍यात "खुला राज'! 
फलटण तालुक्‍यातील खुल्या प्रवर्गाला 1978 नंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची संधी मिळालेली नाही. सध्या जिल्हा परिषद अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित आहे. त्यातही फलटण तालुक्‍यातील सातही गट खुले राहिल्याने जिल्ह्याच्या राजकारणात फलटण तालुक्‍यात "खुला राज' असल्याचे चित्र आहे.

Web Title: Reservations open category