नागरिकांनी विकला 205 किलो ओला कचरा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

सातारा - नागरिकांना ओला-सुका कचरा वेगळा करण्याची सवय लागावी, या उद्देशाने ओला कचरा खरेदी योजनेचा प्रभाग अठरामध्ये चिमणपुरा व व्यंकटपुरा पेठेत आज प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी एकूण 205 किलो ओला कचरा गोळा झाला. या ओल्या कचऱ्यातून नगरपालिका खतनिर्मिती प्रकल्प राबविणार आहे.

सातारा - नागरिकांना ओला-सुका कचरा वेगळा करण्याची सवय लागावी, या उद्देशाने ओला कचरा खरेदी योजनेचा प्रभाग अठरामध्ये चिमणपुरा व व्यंकटपुरा पेठेत आज प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी एकूण 205 किलो ओला कचरा गोळा झाला. या ओल्या कचऱ्यातून नगरपालिका खतनिर्मिती प्रकल्प राबविणार आहे.

पालिकेचे आरोग्य समितीचे सभापती वसंत लेवे यांच्या पुढाकाराने प्रभाग 18 मध्ये ओला कचरा नागरिकांकडून थेट विकत घेण्याचा प्रायोगिक उपक्रम आज सुरू झाला. श्री. लेवे हे याच प्रभागाचे नेतृत्व करतात. सातारा शहरात (पालिका क्षेत्रात) रोज सुमारे 50 टन कचरा गोळा होतो. कोणत्याही प्रक्रियेविना हा कचरा सोनगाव कचरा डेपोत उघड्यावर टाकला जातो. या कचऱ्यामध्ये सुमारे 40 टक्के ओला कचरा असतो. दुर्गंधी, माशांचा उपद्रव आदींसाठी ओला कचरा कारणीभूत ठरतो. हा कचरा वेगळा गोळा करून त्यातून खतनिर्मिती झाल्यास अनेक प्रश्‍न सुटण्यास मदत होऊ शकते. कचरा वेगळा करण्याची ही प्रक्रिया ज्या ठिकाणी कचरा निर्माण होतो, म्हणजे घरातच होणे अपेक्षित आहे. कचरा वर्गीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी पालिकेने हा ओला कचरा प्रति किलो दीड रुपया दराने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

व्यंकटपुरा पेठेतून या अभिनव व प्रायोगिक तत्त्वावरील उपक्रमाला सुरवात झाली. चिमणपुऱ्यातील 400 व व्यंकटपुऱ्यातील 750 कुटुंबांचा प्रभाग 18 मध्ये समावेश आहे. पालिकेच्या घंटागाडीमार्फत हा कचरा वजन करून गोळा करण्यात आला. घंटागाडीमध्ये ओला व सुका कचरा वेगळा ठेवण्यात आला. पहिल्याच दिवशी चिमणपुऱ्यातून 102 किलो, तर व्यंकटपुऱ्यात 103 किलो ओला कचरा गोळा झाल्याची माहिती वसंत लेवे यांनी दिली. पालिकेच्या सोनगाव कचरा डेपोत कंपोस्ट पिट तयार करण्यात आले आहे. जमा झालेला ओला कचरा या पिटामध्ये साठविण्यात येईल. त्यातून तयार झालेले खत पालिकेच्या उद्यानांमध्ये वापरण्यात येणार असल्याचे श्री. लेवे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Residents sold 205 kg of wet waste