Response to Pharala's Shivbhojan thali
Response to Pharala's Shivbhojan thali

उपवासाच्या शिवथाळीवरही नगरकरांनी मारला आडवा हात

नगर ः महाशिवरात्रीनिमित्त गरजूंना फराळाचा आस्वाद घेता यावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेले उत्कृष्ट नियोजन कामी आले. शासनाच्या काटेकोर नियमांचे पालन करीत निश्‍चित प्रमाणात शिवभोजन केंद्रांवर फराळाची सुविधा उपलब्ध केली. परिणामी राज्यात सर्वाधिक 751 थाळ्या संपविण्याचा विक्रम नोंदवला गेला.

दुसरीकडे राज्यात असा पथदर्शी प्रयोग कुठेही न राबविल्याने 250 थाळ्याही संपताना केंद्रचालकांच्या नाकीनऊ आल्याचे समजते. नगरला प्रशासनाने राबविलेला फराळाचा फंडा राज्यात पथदर्शी ठरत आहे. 

शिवभोजन योजनेद्वारे शहरात मंजूर असलेल्या पाच केंद्रांत 900 थाळ्यांचे शिवभोजन सुरू आहे. काल प्रशासनाने महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिवभोजन केंद्रांवर फराळाची सुविधा उपलब्ध केली. त्यात शेंगदाण्याची आमटी, राजगिऱ्याचा भात, चपाती, बटाट्याची भाजी यांचा समावेश होता.

यासाठी शासन आदेशाची पूर्ण दक्षता घेत जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने उचललेले पाऊल दिशादर्शकच ठरले. शिवभोजन योजनेत नगर जिल्ह्याने सुरवातीपासून आघाडी घेतली. महाशिवरात्रीच्या दिवशी बहुतांश नागरिक फराळ घेतात. त्यावर शासन निर्देशाची काटेकोर अंमलबजावणी करीत निश्‍चित प्रमाणात शिवभोजनाची सुविधा प्रशासनाकडून केली गेली होती. त्याचबरोबर नेहमीचे जेवणही उपलब्ध करून देण्यात आले होते.

यात थाळ्यांच्या संख्येने उच्चांकी आकडा गाठत 751 थाळ्या संपविण्याचा विक्रम नोंदवला. जिल्ह्यात हमाल पंचायत संचालित कष्टाची भाकर केंद्र, कृष्णा भोजनालय, सुवर्णम प्राइड या तिन्ही केंद्रांवर आता 200 थाळ्या; तर दत्त हॉटेल, आवळा पॅलेस या ठिकाणी 150 थाळ्यांची मर्यादा करण्यात आली.

पाचही केंद्रांत थाळ्यांची संख्या 900 झाली आहे. नव्याने पाच केंद्रांना जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी मंजुरी दिल्याने ही केंद्रेही मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली सुरू आहेत. 
 
लोकांची गरज लक्षात घेऊनच महाशिवरात्रीला शिवभोजन थाळीत फराळ देण्यात आला. त्यास गरजूंचा उदंड प्रतिसाद मिळाला. शासन निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करत निश्‍चित प्रमाणात ठरलेले अन्न दिले जात आहे. 
- राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com