हुतात्मादिनी निपाणीत बंदला प्रतिसाद 

nipani
nipani

निपाणी : हुतात्मादिनी म. ए. समिती, शिवसेना आणि मराठी भाषिकांनी हुतात्मादिनी गुरुवारी (ता. 17) पुकारलेल्या "निपाणी बंद'ला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यामध्ये शहरातील सर्व व्यावसायिकांसह नागरिकांनी एकजुट दाखवत सहभाग घेतला. बंदमुळे नेहमी गजबजलेल्या रस्त्यासह बाजारपेठेत दिवसभर शुकशुकाट दिसत होता. हुतात्मादिनासह बंदच्या पार्श्‍वभूमीवर शहरात पोलिस बंदोबस्त ठेवला होता. 

हॉटेल, कापड दुकाने, किराणा दुकाने व अन्य व्यावसायिकांनी दुकाने उघडलेली नव्हती. सर्व व्यावसायिक व नागरिक आपले व्यवहार बंद ठेवून हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावनाका व साखरवाडी येथील कार्यक्रमात सहभागी झाले. त्यामुळे नेहमी गजबजलेल्या आणि आठवडी बाजार असतानाही बसस्थानकासह मुरगूडरोड, चिक्कोडीरोड, जुना पी. बी. रोड, साखरवाडी, जुना मोटर स्टॅंन्ड, अशोकनगर, कोठीवाले कॉर्नर, बेळगावनाका परिसरात शुकशुकाट दिसत होता. 

नरवीर तानाजी चौक ते दलालपेठ, महादेव मंदिरपर्यंत सर्व व्यावसायिकांनी आपले व्यवहार बंद ठेवून हुतात्म्यांना अभिवादन केले. शाळा, महाविद्यालये व अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद असल्याने शहरातील रस्त्यावरील वर्दळ कमी दिसत होती. कोठीवाले कॉर्नर, भाजीपाला मार्केट परिसरातील भाजी विक्रेत्यांनी बंदमध्ये सहभाग घेतला होता. त्यामुळे भाजीमार्केटमध्ये किरकोळ वर्दळ होती. 

बंदच्या पार्श्‍वभूमीवर मंडल पोलिस निरीक्षक संतोष सत्यनायक यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार एच. डी. मुल्ला, एस. एस. जाधव, एम. जी. निलाखे यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात होते. शिवाय साखरवाडी, बसस्थानक परिसरात पोलिस व्हॅनसह अतिरिक्त पोलिस तुकड्या तैनात झाल्या होत्या. तरीही शहरवासियांनी एकीची वज्रमुठ दाखवत दिवसभर आपले व्यवहार बंद ठेवले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com