संघटनांवरील निर्बंध खेळाडूंच्या मुळावर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 मे 2018

सातारा - एकविध क्रीडा संघटनेवर जिल्ह्याचा वरचष्मा राहावा, यासाठी प्रयत्नशील असलेल्या जिल्ह्यातील जलतरण आणि कबड्डी या खेळ प्रकारातील संघटना आणि संघटकांना सध्या मैदानाबरोबरच न्यायालयीन लढाईस सामोरे जावे लागत आहे. अशा स्थितीत वरिष्ठ स्तरावरील संघटनांद्वारे येणारे निर्बंध खेळाडू व संघटनांच्या मुळावर येत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्‍त होत आहेत. 

सातारा - एकविध क्रीडा संघटनेवर जिल्ह्याचा वरचष्मा राहावा, यासाठी प्रयत्नशील असलेल्या जिल्ह्यातील जलतरण आणि कबड्डी या खेळ प्रकारातील संघटना आणि संघटकांना सध्या मैदानाबरोबरच न्यायालयीन लढाईस सामोरे जावे लागत आहे. अशा स्थितीत वरिष्ठ स्तरावरील संघटनांद्वारे येणारे निर्बंध खेळाडू व संघटनांच्या मुळावर येत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्‍त होत आहेत. 

राज्यातील हौशी जलतरण संघटनेच्या दोन गटांमधील वाद संपुष्टात न आल्याने भारतीय जलतरण महासंघाने (एसएफआय) अखेर राज्य जलतरण संघटनेची मान्यता नुकतीच रद्द केली. हा निर्णय घेताना महासंघाने महाराष्ट्रातील जलतरणपटूंचे नुकसान होऊ नये, यासाठी आगामी कुमार राष्ट्रीय स्पर्धांसाठी राज्याचा संघ निवडण्याकरिता राज्य स्पर्धेऐवजी निवड चाचणी घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार येत्या २५ ते २७ मे रोजी पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात निवड चाचणी घेतली जाईल. केवळ चाचणी असल्यामुळे स्पर्धकांना प्रमाणपत्रे मिळणार नाहीत. या चाचणीसाठी जलतरण महासंघ दोन निरीक्षक पाठविणार आहे. अधिक माहितीसाठी जय आपटे (मोबाईल क्रमांक - ९८२२४३१०१५) यांच्याशी संपर्क साधावा, असे महासंघाने स्पष्ट केले आहे.

तर राज्यात येत्या २७ मे रोजी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनची निवडणूक होणार आहे. राज्याच्या निवडणुकीत प्रत्येक जिल्ह्याला अथवा जिल्हा प्रतिनिधींस मतदानाचा अधिकार असतो. सातारा जिल्हा कबड्डी असोसिएशनमध्ये गेली अनेक वर्षे दोन गटांत वाद सुरू आहे. त्यातील एक गट न्यायालयातही गेला आहे. परिणामी न्यायालयीन निकाल लागेपर्यंत कोणत्याही गटाला राज्य कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीसाठी मतदानाचा अधिकार देऊ नये, अशी याचिकाही दाखल झाली. न्यायालयाने ते मान्य केल्यामुळे साताऱ्याला यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकारापासून वंचित राहावे लागणार आहे. परिणामी हे वाद जिल्ह्याच्या राज्यस्तरावरील अस्तित्वावरही गंडांतर आणणारे ठरत आहेत, हे निश्‍चित. 

राज्यात दोन जलतरण संघटना कार्यरत होत्या. एका संघटनेचे अध्यक्ष हे साताऱ्याचे होते. यामुळे कोणती अधिकृत अन्‌ अनधिकृत हे पाहत बसण्यापेक्षा आम्हाला दोन्ही संघटनांच्या राज्य अजिंक्‍यपद स्पर्धांत सहभागी व्हावे लागत होते. यामुळे आर्थिक भुर्दंडाबरोबरच कामगिरीवर परिणाम व्हायचा.
- एक जलतरणपटू, सातारा 

गेली २० वर्षे राज्य कबड्डी संघटनेच्या अधिपत्याखाली आम्ही कार्यरत आहोत. वरिष्ठ संघटनेने अद्याप जिल्हा प्रतिनिधींची नावे कळविलेली नाहीत. ती समजण्याचा गुरुवारी शेवटचा दिवस होता. पण, न्यायालयीन प्रक्रियेमुळे सध्यातरी जैसे थे परिस्थिती आहे.
- ज्येष्ठ सदस्य, जिल्हा कबड्डी संघटना, सातारा 

Web Title: Restrictions on Organizations