जिल्ह्यातील 66 हजार कुटुंबे चूलमुक्‍त 

विशाल पाटील
गुरुवार, 7 मार्च 2019

सातारा - चुलीवर सरपण जाळताना त्याचा धूर, डोळ्यांतून येणारे पाणी... असे चित्र तब्बल 66 हजार 580 कुटुंबातील पुसले गेले आहे. पंतप्रधान उज्ज्वला योजनेतून गॅसजोडणी देण्यात आल्याने ही कुटुंबे चूलमुक्‍त बनली आहेत. त्याचा परिणाम म्हणून गत सहा महिन्यांत जिल्ह्यात वितरण केल्या जाणाऱ्या दीड लाख लिटर रॉकेलची बचतही झाली आहे. 

सातारा - चुलीवर सरपण जाळताना त्याचा धूर, डोळ्यांतून येणारे पाणी... असे चित्र तब्बल 66 हजार 580 कुटुंबातील पुसले गेले आहे. पंतप्रधान उज्ज्वला योजनेतून गॅसजोडणी देण्यात आल्याने ही कुटुंबे चूलमुक्‍त बनली आहेत. त्याचा परिणाम म्हणून गत सहा महिन्यांत जिल्ह्यात वितरण केल्या जाणाऱ्या दीड लाख लिटर रॉकेलची बचतही झाली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "स्वच्छ इंधन, बेहत्तर जीवन' असा नारा देत पंतप्रधान उज्ज्वला योजना अंमलात आणली. त्याअंतर्गत देशातील दारिद्य्ररेषेखालील पाच कोटी महिलांना मोफत घरगुती एल. पी. जी. गॅस उपलब्ध करून दिला गेला. ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने स्वयंपाक करताना धुरामुळे डोळ्यांवर व शरीरावर होणारा दुष्परिणाम टाळण्यासाठी ही योजना राबविली जात आहे. त्यामुळे महिलांचे सक्षमीकरण होण्याबरोबर त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. शिवाय, पर्यावरणाचा ऱ्हासही थांबविण्यात ही योजना यशस्वी ठरत आहे. घरगुती इंधनासाठी दरवर्षी हजारो झाडांची कत्तल होत होती. जंगल, डोंगर व शेतातून गोळा करून आणलेली लाकडे, चिपाडे, वाळलेले गवत वा थापलेल्या शेणाच्या गोवऱ्या इत्यादींचा वापर करून ग्रामीण भागातील स्त्रियांना स्वयंपाक करावा लागत असतो. त्यासाठी महिलांची पायपीटही होते. मात्र, या योजनेतून घराघरांत गॅसजोडणी मिळू लागल्यामुळे सरपण जाळण्याचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. 

स्वयंपाक करताना लाकडी जळण वापरल्यामुळे होणारे तीव्र दुष्परिणाम कमी करणे, स्वयंपाकासाठी अस्वच्छ जळण वापरल्यामुळे होणारे दुष्परिणाम कमी करणे, घरात लाकडी जळण वापरल्यामुळे लहान बालकांना बऱ्याच मात्रेत होणाऱ्या श्वासोच्छवासाच्या तक्रारी दूर करणे, या उद्देशाने ही योजना राबविली गेली. परिणामी, जिल्ह्यातील 66 हजार 840 कुटुंबामध्ये गॅसजोडणी देण्यात आली आली असून, महिलांच्या चेहऱ्यांवर हास्य फुलू लागले आहे. 

दरम्यान, गॅसजोडणी वाढल्यामुळे गत ऑगस्ट महिन्यातून 13 टॅंकर (एक लाख 56 हजार लिटर) रॉकेलची मागणी कमी झाली आहे. गॅसजोडणी असतानाही जे कुटुंबीय गॅसजोडणी नसल्याचे हमीपत्र देवून शासकीय रॉकेल मिळत आहे, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या सूचना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. 

सातारा शहर केरोसिनमुक्‍त  
कुटुंबात गॅसजोडणी दिल्यानंतर त्यांचे रॅकेल बंद केले जाते. सातारा नगरपालिका क्षेत्रासह शहर परिसरात सर्व कुटुंबात गॅसजोडणी असल्याने सातारा शहर केरोसिनमुक्‍त बनले आहे. आता कऱ्हाड व फलटण शहरही काही महिन्यांत केरोसिनमुक्‍त केले जाणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी सांगितले. 

वर्षनिहाय गॅसजोडणी 

21,412 
2016-17 

28,236 
2017-18 

16,192 
2018 (ऑगस्टअखेर) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The result of gas connection from Ujjwala scheme