हुतात्मा स्मारकातच थाटला संसार

दुशेरे - हुतात्मा स्मारकामध्ये एका व्यक्तीने थाटलेला संसार.
दुशेरे - हुतात्मा स्मारकामध्ये एका व्यक्तीने थाटलेला संसार.

दुशेरेत स्मारकाची स्थिती बिकट; बेशरम वनस्पतींचा वेढा

रेठरे बुद्रुक - दुशेरे येथील हुतात्मा स्मारकाची स्थिती बिकट आहे. शासनाच्या दुर्लक्षामुळे स्मारकाभोवती बेशरम वनस्पतींचा वेढा आहे. स्मारकात चोऱ्याही होत आहेत. एका कुटुंबाने तेथे वास्तव्यासाठी तळ ठोकला आहे. ग्रामपंचायतीने स्मारकात उभारलेली व्यायामशाळाही धूळ खात पडून आहे. दुशेरेत प्रवेश करताच १९८१ मध्ये बांधलेले हुतात्मा स्मारक दिसते. व्यंकप्पा जाधव व महादेव लोहार यांच्या हौतात्म्याबद्दल शासनाने हे स्मारक उभारले आहे.

स्मारक स्तंभ, इमारत व सभोवती सुमारे पावणेदोन एकराचा परिसर आहे. स्मारकाच्या उभारणीपासूनच त्याला समस्यांचे ग्रहण चिकटलेले आहे. सुरवातीला स्मारकाच्या पालकपदावरून गावामध्ये वाद झाले. तेव्हापासून नेमलेले पालक स्मारकाकडे ढुंकूनही पाहात नाहीत. २६ जानेवारी, एक मे, नऊ ऑगस्ट व १५ ऑगस्टला शालेय विद्यार्थी येऊन स्तंभाजवळ ध्वज फडकवतात. त्याव्यतिरिक्त कोणीही तिकडे फिरकत नाही. स्मारक उभारल्यापासून शासनाने डागडुजी अथवा देखभाल केलेली नाही. मध्यंतरी काही क्षेत्रात संरक्षक तारेचे कुंपण घातले. सध्या हे स्मारक असुविधेच्या छायेत वावरत आहे. स्मारकामध्ये अंधार आहे. सेवेस असणाऱ्या किसन जाधव यांनी विजेची सोय केली; पण तीदेखील समाजकंटकांनी उद्‌ध्वस्त केली. काही वर्षांपूर्वी परिसरातील झाड नैसर्गिक आपत्तीत कोसळले. ते बाहेर काढताना एका त्रयस्ताने परिसरातील अनेक झाडांची विनापरवाना कत्तल केली. या प्रकारानंतर साहित्य व तारेच्या कुंपणाच्या चोऱ्या झाल्या. 

ग्रामपंचायतीने स्मारकातच व्यायामशाळा थाटली. तेव्हापासून हे साहित्य धूळखात पडून आहे. काही महिन्यांपूर्वी तेथे विजेसाठी सौरऊर्जा प्रकल्प बसविण्यात आला. तोही स्थानिकांनी मोडतोड करून बंद पाडला. एका व्यक्तीने तर बेघर असल्याचे भासवून गेल्या अनेक महिन्यांपासून स्मारकातच संसार थाटला आहे. स्मारकाजवळ जनावरांचा गोठा आहे. या सर्व समस्यांच्या मालिकांमधून स्मारकाची अवस्था दिवसेंदिवस बिकट बनत चालली आहे.

स्मारकाच्या देखभालीकडे मी जिव्हाळ्याने बघतो; पण मलाच काही जण त्रास देतात. शासनाने स्मारकाच्या दुरवस्थेची दखल घ्यावी व या गावच्या वैभवाचा सन्मान वाढवावा.
- किसन पिराजी जाधव, सेवक, दुशेरे स्मारक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com