पूरग्रस्तांच्या मदतीला कंत्राटी अन्‌ निवृत्त डॉक्‍टर 

तात्या लांडगे
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

सांगली जिल्ह्यातील 81 तर कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 235 गावांमध्ये पुराचे पाणी शिरले. त्यामुळे सुमारे सहा लाख नागरिकांना सुखाचा संसार सोडून स्थलांतरीत व्हावे लागले. 

सोलापूर : राज्यातील विविध विभागांमध्ये काही वर्षांपासून सुमारे दीड लाख पदे रिक्‍त असल्याने पुरग्रस्त भागात आरोग्यसेवा देण्यास अडचणीत येत आहेत. त्यामुळे सरकारने 14 डॉक्‍टर तर 796 निवृत्त कर्मचाऱ्यांसह कंत्राटी कर्मचाऱ्यांना बोलवण्याची नामुष्की आरोग्य विभागावर ओढावल्याचे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

सांगली जिल्ह्यातील 81 तर कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 235 गावांमध्ये पुराचे पाणी शिरले. त्यामुळे सुमारे सहा लाख नागरिकांना सुखाचा संसार सोडून स्थलांतरीत व्हावे लागले. पुराचे पाणी ओसरेपर्यंत या गावांमधील नागरिकांसाठी सरकारने 222 मदत छावण्या सुरु केल्या. आता त्याच ठिकाणी त्यांना आरोग्यसेवा पुरविली जात आहे. मात्र, जिल्हा, उपजिल्हा, प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्‍त पदे असल्याने पुरग्रस्तांच्या मदतीसाठी आरोग्य विभागाचे डॉक्‍टर व कर्मचारी कमी पडत आहेत.

एका छावणीसाठी एक डॉक्‍टर अन्‌ अन्य कर्मचाऱ्यांचे पथक नियुक्‍त केले आहे. दरम्यान, पुरग्रस्त गावांमधील पिण्याच्या पाण्याचे सर्व स्त्रोत दुषित झाल्याने ग्रामस्थांना जुलाब, उलट्या, ताप, मलेरिया, डेंगीसारखे आजार होऊ नयेत म्हणून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यासाठीही स्थानिकांची मदत घ्यावी लागत असल्याची चर्चा आहे. नागरिकांना शुध्द पाणी मिळावे म्हणून दर दिवसाला एक क्‍लोरीनची गोळी दिली जात असून पुरग्रस्तांसाठी तत्काळ औषध उपलब्ध व्हावीत म्हणून कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात औषधांचा साठा करण्यात आल्याचेही त्या अधिकाऱ्याने सांगितले. पुरामुळे कोल्हापुरातील तीन लाख तर सांगलीतील दोन लाख 80 हजार लोक बाधित झाले असून बहूतांश लोकांनी स्थलांतर केले आहे. 

ठळक बाबी... 
- लहान बालके अन्‌ गरोदर मातांची यादी तयार करण्याचे काम युध्दपातळीवर 
- खड्ड्यातील पाणी हटवणे, साथरोगांचा प्रादुर्भाव होणार नाही यादृष्टीने विशेष प्रयत्न 
- गावोगावचे जलशुध्दीकरण प्रकल्प कार्यान्वित होईपर्यंत पाण्याच्या स्त्रोताचे आरोग्य विभागातर्फे शुध्दीकरण 
- केंद्राकडून मिळालेल्या एक कोटी क्‍लोरीनच्या गोळ्या वाटप करण्याचे कामही सुरुच 

पुरग्रस्त भागातील सद्यस्थिती 
पुरामुळे बाधित नागरिक 
5.85 लाख 
मदत छावण्या 
222 
आरोग्य पथके 
222 
कंत्राटी डॉक्‍टर अन्‌ कर्मचारी 
173 
निवृत्त डॉक्‍टर अन्‌ कर्मचारी 
810


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: retire and on contract doctors for the help of flood victims