निवृत्त पोलिस उपायुक्तावर 'यामुळे' दाखल झाला गुन्हा! 

सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

- बनावट कागदपत्रे सादर केली 
- शासनाची फसवणूक केल्याचा आरोप 
- मूळचे अहमदनगर जिल्ह्याचे रहिवासी 

सोलापूर : निवृत्त पोलिस उपायुक्त मधुकर भाऊसाहेब गायकवाड यांच्यावर सदर बझार पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. बनावट कागदपत्रे सादर करून निवृत्तीचा कालावधी वाढवून घेऊन शासनाची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. 

बनावट कागदपत्रांनी मिळविली नोकरी 
मधुकर गायकवाड हे मूळचे पारनेर (जि. नगर) येथील रहिवासी आहेत. त्यांनी त्यांची जन्मतारीख 1 जून 1958 अशी असताना ती 1 जून 1961 अशी असल्याचा दाखला व बनावट कागदपत्रे सादर करून पोलिस उपनिरीक्षक पदावर नोकरी मिळविली. सातारा, औरंगाबाद, नगर यासह विविध ठिकाणी सेवा बजावून गायकवाड हे 8 ऑगस्ट 2018 रोजी सोलापुरात पोलिस उपायुक्त पदावर रुजू झाले. त्यांच्याकडे परिमंडळ विभागाची जबाबदारी देण्यात आली होती. 

हेही वाचा : सहा महिन्यांनी उकरला शेतकऱ्याचा मृतदेह

तीन वर्षापूर्वीच व्हायला हवे होते निवृत्त 
गायकवाड हे 31 मे 2016 रोजी निवृत्त होणे आवश्‍यक होते. त्यांनी 1 जून 1963चा जन्म असल्याचा जन्मतारखेचा उल्लेख असलेला साईनाथ हायस्कूल (ता. पारनेर, जि. नगर) या शाळेचा शाळा सोडल्याचा बनावट दाखला आणि निवडणूक ओळखपत्र शासनाला सादर केले. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी सुरू होती. चौकशी सुरू असतानाही गायकवाड हे सोलापुरात उपायुक्त पदावर कार्यरत होता. चौकशीत बनावट कागदपत्रांची माहिती समोर आल्याने 21 सप्टेंबर 2019 रोजी गायकवाड यांच्याकडील पोलिस उपायुक्त पदाचे पदभार काढून घेऊन सेवानिवृत्त करण्यात आले. 

हेही वाचा : अल्पवयीन मुलीवर बलात्कार

महाराष्ट्रातील पहिलीच घटना 
गायकवाड यांनी बनावट कागदपत्रे शासनाला सादर करून फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिस आयुक्तालयातील प्रशासकीय अधिकारी शिवाजी कोष्टी यांनी फिर्याद दिली आहे. बनावट कागदपत्रे सादर करून नोकरीचा कालावधी वाढवून घेतल्याची महाराष्ट्रात पहिलीच घटना असण्याची शक्‍यता आहे. बनावट कागदपत्रे देऊन शासनाची फसवणूक करणे चुकीचे असल्याचे निवृत्त पोलिस कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष दीपक जतकर यांचे म्हणणे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Retired police officer charged Filed