निवृत्त शिक्षकाचे शाळेला २५ लाखांचे दान

एरंडोली - रयत शिक्षण संस्थेच्या शाळेसाठी विठ्ठल पाटील यांच्याकडून धनादेश स्वीकारताना के. बी. मालुसरे, वाय. बी. सावंत, एम. सी. पाटील, ॲड. अजित सूर्यवंशी आदी.
एरंडोली - रयत शिक्षण संस्थेच्या शाळेसाठी विठ्ठल पाटील यांच्याकडून धनादेश स्वीकारताना के. बी. मालुसरे, वाय. बी. सावंत, एम. सी. पाटील, ॲड. अजित सूर्यवंशी आदी.

सांगली - रयत शिक्षण संस्थेत दीर्घकाळ ज्ञानदान करून निवृत्त झालेल्या विठ्ठल कृष्णा पाटील यांनी निवृत्तीनंतर हाती आलेल्या २५ लाख रुपयांचे दान याच संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, एरंडोली या शाळेला दिले. प्रजासत्ताकदिनी हा दातृत्वाचा सोहळा रंगला. या मदतीतून एरंडोली हायस्कूल आता इमारतीचा विस्तार करणार आहे.

मिरज तालुक्‍यातील एरंडोली येथे रयतचे हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय आहे. पुरेशी इमारत नसल्याने ते दोन सत्रात भरते. त्यामुळे शिक्षण उपक्रमात अडचणी आहेत. मूळ एरंडोलीकर असलेल्या विठ्ठल पाटील यांना याची कल्पना होती. वरचेवर ते या शाळेला भेट देत होते. त्यांनी निवृत्तीनंतर हा प्रश्‍न सोडवू, असे मनाशी ठरवले होते. सुदैवाने कुटुंब स्थिरस्थावर असल्याने निवृत्तीनंतर हाती आलेला पैसा याकामी द्यावा, हा त्यांचा संकल्प होता. तो त्यांनी तडीस नेला. निवृत्तीचे पैसे जमा झाले आणि आहे तसेच त्यांनी ते शाळेला देऊ केले. रयत संस्थेचे निरीक्षक के. बी. मालुसरे, सहनिरीक्षक वाय. बी. सावंत, ॲड. अजित सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत शाळा समितीचे सदस्य बाबगोंडा पाटील, शिवाजीराव शिरदवडे, सावंता माळी, मुख्याध्यापक एम. सी. पाटील यांनी धनादेश स्वीकारला. पाटील म्हणाले, ‘‘कर्मवीर अण्णांनी आयुष्य वेचून ही संस्था उभी केली, तिच्या विस्तारात माझे थोडेसे योगदान द्यावे, या भावनेतून मी हे करतोय. शाळा एका सत्रात भरेल तो माझ्यासाठी सुदिन असेल.’’ बाबगोंडा पाटील म्हणाले, ‘‘विठ्ठल पाटील यांनी दान देताना कोणतीच अपेक्षा व्यक्त केली नाही, मात्र आम्ही गावकऱ्यांच्या विचाराने कनिष्ठ महाविद्यालयाला त्यांचे नाव देत आहोत.’’

आता आपली बारी
रयत शिक्षण संस्थेचे हे शतकमहोत्सवी वर्ष आहे. यानिमित्ताने माजी विद्यार्थ्यांनी शाळा विकासाला हातभार लावावा, असे आवाहन या वेळी करण्यात आले. शाळेच्या विकासासाठी  आणि विस्तारासाठी आता माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन या वेळी के. बी. मालुसरे यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com